पुणे - गेल्या वर्षी याच कालावधीत खडकवासला धरण प्रकल्पात आजच्या तारखेला ७ टीएमसी पाणीसाठा होता, पण यंदा तो केवळ ४ टीएमसी आहे. टंचाईच्या काळात टँकरचालकांनी टँकरचे दर वाढवले असून, नागरिकांची लूट होत आहे. त्यामुळे यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाणीसाठ्यांवर नियंत्रण आणावे, टँकरचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी पाऊल उचलावे यासाठी त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असे महापौर मंजूषा नागपुरे यांनी सांगितले.
पाणी कपातीनंतर शहरातील तक्रारींमध्ये वाढ झाली असून आतापर्यंत सुमारे ४३७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शहरात सोमवारी (ता. १५) महापालिकेच्या टँकरच्या १ हजार ४५० फेऱ्या झाल्या होत्या. पण नागरिकांकडून टँकरची मागणी वाढत असून, त्याद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. आज १ हजार ६६५ फेऱ्या झाल्या असून, चार दिवसात टँकरची मागणी २१५ ने वाढली आहे.
धरणातील पाणी साठा कमी होत असताना शेतीसाठी पाणी सोडायचे की नाही याचा निर्णय पाटबंधारे विभाग घेईल. पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन महापालिकेने नियोजन सुरू केले असून शेतीसाठी किती पाणी द्यायचे हा निर्णय संबंधित विभागाने घ्यायचा आहे.
खाजगी टँकरच्या वाढत्या दरांबाबत विचारले असता महापौर म्हणाल्या, खासगी टँकरने दर वाढविल्याबाबत अद्याप अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. मात्र, लांब अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याने काही प्रमाणात दरवाढ होणे स्वाभाविक आहे. पण ही दरवाढ दोनपट तीनपट असणे योग्य नाही. टँकर चालक, प्रशासन आणि संबंधित घटकांची बैठक घेऊन टँकर दरांसाठी धोरण तयार करण्याची गरज आहे. पण सध्या त्यांच्या दरावर नियंत्रण ठेवणे, पाण्यासाठी आरक्षित करणे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करू, असे नागपुरे यांनी सांगितले.
पाणी कपातीविरोधात आंदोलन
पुणे महापालिकेच्या मुख्यप्रवेशद्वारे बाहेर गेल्या चार दिवसांपासून अलीरजा यंग सर्कलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तौसिफ शेख यांनी पाणी कपातीच्या विरोधात उपोषण सुरु केले होते. शहरातील बांधकामे बंद करून ते पाणी पुणेकरांना द्या, टँकरमाफियांवर कारवाई करा यामागणीसाठी आंदोलन सुरु केले होते. गेल्या चार दिवसात सत्ताधाऱ्यांपैकी कोणीही या आंदोलनाची दखल घेतली नाही. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पाणी कपातीविरोधात सभागृहात आवाज उठवून ही कपात मागे घ्यायला लावली जाईल असे आश्वासन दिल्याने आज (ता. १९) उपोषण स्थगित केल्याचे शेख यांनी सांगितले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.