शिवणे : रविवारी सायंकाळी झालेल्या पावसाने कोंढवे-धावडे येथील वारजे-बहुली-मुठा रस्त्यावरील कचरा व्यवस्थापन आणि रस्ते नियोजनातील त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणल्या. रस्त्यावर साचलेल्या पाण्याने अक्षरशः तळ्याचे रूप धारण केल्याने सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली. नागरिकांची मोठी गैरसोय झाली. पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रभावी व्यवस्था नसल्याने परिसराचा संपर्क तुटला आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका वाहनधारकांना सहन करावा लागला.
कोंढवे-धावडे येथील सुदर्शन मित्र मंडळाजवळील पुलावर रविवारी पावसाचे पाणी साचल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. नागरिकांकडून पुलाजवळ कचरा टाकला जातो. रविवारी कचरा उचलला गेला नसल्याने तो मोठ्या प्रमाणात साचला होता. पुलावरील पाण्याचा निचरा करणारी छिद्रे कचऱ्याने तुंबल्याने पाणी साचून राहिले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विनायक किंडरे, अनिकेत धावडे, शुभम ठाकर आणि सागर अवचिते यांनी स्वतः पाण्यात उतरून कचरा हटवत छिद्रे मोकळी केली. त्यानंतर पाण्याचा निचरा होऊन सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाली.
कोंढवे-धावडे येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ रस्त्याची पातळी एकसारखी नसल्याने त्या ठिकाणी खड्ड्यासदृश भाग तयार झाला आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला आणि पाणी वाहून जाण्यासाठीच्या छोट्या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला. रस्त्यावर तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली, तर वाहतूक सात वाजता सुरळित झाली.
"ट्रॅक्टरच्या चाकाएवढ्या उंचीपर्यंत पाणी साचले होते. पुलालगतच्या माझ्या फॅब्रिकेशनच्या दुकानात पाणी शिरले. तसेच गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमध्येही पाणी गेले. पाण्यात एक टेम्पो ट्रॅव्हलर बंद पडला. वाहनांच्या ये-जा करताना निर्माण होणाऱ्या लाटांमुळे परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागला."
विनायक किंडरे, ग्रामस्थ
"जलशुद्धीकरण केंद्रासमोरील तीन- चार दुकाने आहेत. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ते थेट दुकानांमध्ये शिरले. किराणा मालाचे नुकसान झाले असून व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. पावसाळ्यापूर्वी प्रशासनाने जलनिस्सारणाची योग्य व्यवस्था करणे आवश्यक होते."
दिलीप बारटक्के, ग्रामस्थ
दोन्ही ठिकाणच्या पाणी साचण्याच्या समस्येबाबत ‘सकाळ’ने गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने वृत्तांकन केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी उपाययोजनांचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्याने आता प्रत्येक पावसात ही समस्या कायम राहिली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.