नागपूर : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) २०२६ ची पुनर्परीक्षा रविवारी (ता.२१) पार पडली. ३ मे रोजी झालेल्या पेपरच्या तुलनेत आजचा पेपरची काठिण्य पातळी अधिक असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा आव्हानात्मक ठरली. त्यात भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांनी विद्यार्थ्यांना चांगलाच घाम फोडला.
भौतिकशास्त्र हा प्रश्नपत्रिकेतील सर्वांत कठीण विभाग ठरला. या विभागात संकल्पनांवर आधारित, गणिती मांडणी असलेले तसेच आलेखांवर आधारित प्रश्नांचा समावेश होता. अनेक प्रश्न सोडविण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याने विद्यार्थ्यांवर वेळेचे दडपण आले.
रसायनशास्त्र विभागही तुलनेने कठीण आणि लांबलचक होता. अनेक प्रश्नांचे स्वरूप विश्लेषणात्मक असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नासाठी अधिक वेळ द्यावा लागला. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रश्नपत्रिका वेळेत सोडविणे आव्हानात्मक ठरले. याउलट जीवशास्त्र विभाग तुलनेने सोपा होता. या विभागात ‘असर्शन-रिझन, स्टेटमेंट’ आधारित तसेच ‘मॅच-द-पेअर’ प्रकारच्या प्रश्नांचा समावेश होता. एनसीईआरटी अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे अभ्यासक्रमाचे सखोल वाचन केलेल्या विद्यार्थ्यांना या विभागात चांगले गुण मिळण्याची शक्यता आहे.
यंदाची नीट पुनर्परीक्षा मध्यम ते कठीण स्वरूपाची ठरली. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांमधील अवघड व वेळखाऊ प्रश्नांचा विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांवर परिणाम होण्याची शक्यता असून यंदाचा कट-ऑफ आणि गुणवत्ता यादीवरही त्याचा प्रभाव दिसून येऊ शकतो. यंदाची नीट पुनर्परीक्षा विद्यार्थ्यांसाठी वेळेच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरली. प्रश्नपत्रिकेची एकूण पातळी मध्यम ते कठीण होती. विशेषतः भौतिकशास्त्र विभागातील संकल्पनात्मक, गणिती आणि आलेखाधारित प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांची चांगलीच कसोटी लागली. अनेक प्रश्न सोडविण्यास अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागल्याने विद्यार्थ्यांवर वेळेचे दडपण निर्माण झाले. एकूणच भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन विषयांचा विद्यार्थ्यांच्या अंतिम गुणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा उच्च गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात कमी राहू शकते आणि गुणवत्ता यादीत तसेच कट-ऑफमध्ये त्याचे प्रतिबिंब दिसू शकते.
डॉ. समीर फाळे, वरिष्ठ नीट तज्ज्ञ.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.