बाळापूर : शेगाव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन अकोटच्या दिशेने परतणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीची एसटी बसशी समोरासमोर भीषण धडक झाली. अंदुराजवळील पानखास पुलानजीक रविवारी (ता. २१) दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरील मोठ्या भेगांमुळे दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. श्रीकांत पुरुषोत्तम बायस्कार (वय २५) आणि कुणाल राजू भोरे (वय २४, दोघेही रा. गजानन महाराज नगर, अकोट) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत आणि कुणाल हे रविवारी संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगाव येथे गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर ते एमएच ३० बीई ७९७० क्रमांकाच्या दुचाकीने अकोटकडे परतत होते. दरम्यान, शेगाव-तेल्हारा-अकोट मार्गावरील अंदुरा गावाजवळ त्यांची दुचाकी समोरून येणाऱ्या चांदूर बाजार आगाराच्या एसटी बसवर (एमएच १४ एमटी ०२५३) जाऊन जोरदार आदळली. ही बस चांदूर बाजार येथून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी एसटीच्या पुढील चाकाखाली अडकून सुमारे १०० फूट फरफटत गेली. बसचालक राहुल उकर्डे यांनी प्रसंगावधान राखत तातडीने ब्रेक लावून बसवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये १७ प्रवासी होते. सुदैवाने ते सर्व सुरक्षित आहेत. मात्र, दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा गंभीर दुखापतींमुळे घटनास्थळीच मृत्यू झाला.
खराब रस्त्यामुळे अपघात?
शेगाव-तेल्हारा-अकोट या मुख्य मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या भेगा पडल्या आहेत. या धोकादायक रस्त्यामुळे दुचाकीवरील चालकाचा ताबा सुटून वाहन थेट एसटी बसवर आदळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
घरचे दिवे विझल्याने आक्रोश
दोन्ही मृत तरुण अकोटमधील गजानन महाराज नगर परिसरातील शेजारी होते. एकाच गल्लीतील दोन उमदे तरुण भीषण अपघातात दगावल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या घरी तसेच परिसरात नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी मोठी गर्दी केली. माता-पित्यांसह नातेवाईकांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. रविवारी रात्री दोन्ही मृतदेह अकोट येथे आणण्यात आल्यानंतर संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली.
नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा
अपघाताची माहिती मिळताच उरळ पोलिस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन खंडेराव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह रस्त्यावरच पडून होते. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे तसेच रस्त्याच्या दुरवस्थेमुळेच या दोन्ही निष्पाप तरुणांचा बळी गेल्याचा आरोप करत नातेवाईकांनी घटनास्थळी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोट येथे पाठविण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास उरळ पोलिस करीत आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.