पुणे : ‘‘महागाईचा फटका आज प्रत्येकालाच बसत आहे. मात्र, त्यावर उघडपणे व्यक्त होण्याचे धाडस जनतेत आहे का? जनतेच्या प्रश्नांसाठी विरोधकांनी मोर्चे काढले पाहिजेत, आंदोलने केली पाहिजेत हे अगदी खरे आहे. पण, विरोधकांच्या मोर्चाला तेव्हाच अर्थ प्राप्त होईल, जेव्हा झळ सोसणारी सर्वसामान्य जनता त्या मोर्चांमागे ताकदीने उभी राहील,’’ असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.


‘पुणे पत्रकार कट्ट्या’च्या वतीने आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी कट्ट्याचे संयोजक नीरज जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रा. योगेश बोराटे, संदीप नर्डीले आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. कोल्हे यांनी सद्यःस्थितीतील राजकारण, महागाई, प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व आणि महाराष्ट्राची संस्कृती यावर भाष्य केले.


राज्यात विकासाच्या आणि निधीच्या नावाखाली झालेल्या राजकीय बंडावर प्रश्न विचारला असता डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘रस्ते झाले पाहिजेत, पूल झाले पाहिजेत; पण हे सगळं करण्यासाठी तुम्हाला फुटायाचं आहे का? याला केवळ फुटणे नाही, तर विकणे असेच म्हणतात. जर विकासनिधीसाठीच पक्ष फोडण्यासारख्या गोष्टी कराव्या लागत असतील, तर मग आपण थेट लोकशाहीलाच टाळे ठोकूया.’’


डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र धर्म काय आहे, हे जर पुढच्या पिढीला सांगायचे असेल तर, महाराष्ट्राच्या डीएनएमधील समतेचा विचार काय आहे, ते आधी सांगावे लागेल. संतांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला आता कथित हिंदुत्व हे बाहेरच्या लोकांनी येऊन शिकवण्याची अजिबात गरज नाही. तसेच, महाराष्ट्राचा मूळ डीएनए आता पुसून, काहीतरी वेगळेच लादण्याचा प्रयत्न होत असेल, तर सांस्कृतिक क्षेत्राने धैर्याने पुढे यायला हवे.’’


प्रादेशिक पक्ष संपविण्याचा घाट


‘‘राज्याचे आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न केंद्र पातळीवर प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व अत्यंत आवश्यक असते. मात्र, सध्या जाणीवपूर्वक प्रादेशिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न होत आहे. देशात द्विपक्षीय राजकारण लादले जात आहे. अशा वेळी प्रत्येक प्रदेशाच्या अस्तित्वासाठी आणि त्या-त्या प्रदेशाचे हित जोपासण्यासाठी प्रादेशिक पक्ष टिकवण्याची नितांत गरज आहे, असेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.