गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. अशातच आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे. आसिफ यांनी म्हटले की, ‘जर पाकिस्तानच्या पाणी सुरक्षेला धोका निर्माण झाला, तर आम्ही लष्करी कारवाई करण्याचा विचार करू शकतो.’ पाकिस्तान गंभीर जलसंकटाचा सामना करत असताना आसिफ हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता भारताकडून काय उत्तर दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




काय म्हणाले आसिफ?


गेल्या वर्षी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दीर्घकाळापासून अस्तित्वात असलेला सिंधू जल करार स्थगित केला होता. त्यामुळे आता पाकिस्तानला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर मर्यादा आली आहे. त्यामुळे पाकिस्तानात जलसंकट निर्माण झाले आहे. अशातच आता एआरवाय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ म्हणाले, ‘ज्या क्षणी आम्हाला वाटेल की पाणी हा आमच्या राष्ट्रीय सुरक्षेचा भाग आहे आणि त्याला धोका निर्माण झाला आहे, त्या क्षणी आम्ही भारताविरुद्ध युद्ध छेडण्याचा विचार करू. भारत पाण्याचा पुरवठा रोखण्याच्या दिशेने वेगाने पावले उचलत असल्याचे ठोस पुरावे मिळाल्यास युद्धाचा पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो.’





ख्वाजा आसिफ यांची ही प्रतिक्रिया भारताचे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांच्या एका वक्तव्यानंतर आली आहे. पाटील यांनी जून 2028 पर्यंत पाकिस्तानकडे जाणारे सिंधू नदीचे पाणी पूर्णपणे रोखण्याची शक्यता व्यक्त केली होती. यामुळे पाकिस्तानची कृषी अर्थव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे.




पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित


जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने 1960 चा सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भारताने स्पष्ट केले होते की, पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवले नाही, तोपर्यंत हा निर्णय कायम राहील. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेल्या या करारानुसार, सिंधू नदी खोऱ्यातील सुमारे 80 टक्के पाणी पाकिस्तानच्या वाट्याला जाते आणि त्यावर देशातील सुमारे 80 टक्के शेती अवलंबून आहे.


भारतावर पाण्याचा ‘हत्यार’ म्हणून वापर केल्याचा आरोप


आसिफ यांनी भारतावर पाण्याचा राजकीय आणि धोरणात्मक दबावासाठी वापर केल्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, भारत चिनाब नदीच्या प्रवाहात फेरफार करत आहे आणि महत्त्वाची जलसंबंधित माहिती पाकिस्तानला देत नाही. यापूर्वी सिंधू जल करारांतर्गत पाकिस्तानने भारतीय प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. पाकिस्तानी पथकांनी सुमारे 115 तपासण्या केल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, गेल्या वर्षभरातील घडामोडींविषयी आमच्याकडे माहिती नाही असं आसिफ यांनी म्हटलं आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.