सोलापूर : राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर (Solapur) विधान परिषदेच्या निकालात भाजपने मोठ्या मताधिक्याने ही जागा ही जिंकली. महायुतीचे राजेंद्र राऊत यांनी 365 मतांनी विजय मिळवला. मात्र, या निवडणुकीत पुन्हा एकदा धैर्यशील मोहिते पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळाली. जयकुमार गोरेंनी धैर्यशील मोहिते पाटलांच्या अकलूजमध्ये सभा घेण्याची गरज नसल्याचे म्हटले. तर, दंड दाखवत, गोळी मारल्याची अॅक्शन करत मोहिते पाटलांना डिवचलं होतं. त्यानंतर, आज सकाळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairysheel mohite patil) यांनी निकालाबाबत बोलताना जयकुमार गोरे नाव न घेता टोलेबाजी केली. अकेला भगाऊंगा इन सबको… असा टोला धैर्यशील मोहिते पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
मुंब्य्रातील एमआयएमच्या नगरसेविकेचा ‘कैसे भगाया’ हा डायलॉग चांगलाच गाजला होता. आता, अकेला भगाऊंगा इन सबको… हा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा हा डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. याठिकाणी जर चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री असते तर मागेच ही निवडणूक बिनविरोध झाली असती असा चिमटा धैर्यशील मोहिते पाटलांनी लगावला. या निवडणुकीत फिरुन फिरुन त्यांच्या काळ्या गाडीची टायरं झिजली. संपूर्ण निवडणुकीत जयकुमार गोरे काळ्या रंगाच्या वेल्फेअर गाडीतून फिरत होते, असे मोहिते पाटील यांनी म्हटले.
जयकुमार गोरे यांनी धैर्यशील मोहिते पाटलांवर टीका करताना, ते आता अदृश्य झाले असे म्हटले होते. त्यावर, आम्ही मोहिते पाटील किती महत्त्वाचे आहोत, एका बाजूला आम्हाला अदृश्य झाले म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला आमचं नाव घेतल्याशिवाय यांची दुकानदारीही चालत नाही. अकेला भगाऊंगा इन सबको… कितीही त्रास देऊ द्या, असे म्हणत शेवटी दुवाओ मे याद रखना असा टोला मोहिते पाटलांनी लगावला. दरम्यान, सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत मोहिते पाटील विरुद्ध जयकुमार गोरे असाच प्रत्यक्ष सामना रंगला होता. त्यात, महायुतीचे संख्याबळ जास्त असल्याने महायुतीचे राजेंद्र राऊत विजयी झाले. तर, महाविकास आघाडीच्या संख्याबळापेक्षा अधिक मतं घेण्यात वसंत देशमुख यांना यश मिळालं.
घर बैठे तो लाचार कहेलायेंगे.. लडकर हारे तो मिसाल बन जायेंगे.. अशा पद्धतीने आम्ही लढलो. माझ्याकडे फक्त 16 मते आहेत असे मला हिणवत होते, पण मी त्यावर 100 मते ज्यादा घेऊन दाखवली. दोन अंकी संख्येत जाणार नाही म्हणणाऱ्यांना तीन अंकी संख्येत जाऊन दाखवले आणि जिल्ह्याचा पुरोगामी विचार टिकवला, असे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटले.
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.