गेल्या काही काळापासून इराण आणि अमेरिका यांच्यात तणावाचे वातावरण आहे. मात्र आता दोन्ही देशांमध्ये शातता नांदण्याची शक्यता आहे. इराणने माघार घेतल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प मंगळवारी म्हणले की, सध्या सुरू असलेल्या चर्चेचा भाग म्हणून इराणने आपल्या अणुउर्जा केंद्रांवर दीर्घकालीन आणि कठोर देखरेख ठेवण्यास तत्त्वतः सहमती दर्शवली आहे. त्यांनी असेही म्हटले की, अमेरिका होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजवाहतुकीवरील निर्बंधांमध्ये सवलत देईल आणि अमेरिकेच्या कडक देखरेखीखाली आर्थिक सवलतीही उपलब्ध करून देईल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ‘अमेरिकेच्या विजयाला कमी लेखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की इराण भविष्यात दीर्घकाळासाठी सर्वोच्च स्तरावरील अणु तपासण्यांना पूर्णपणे मान्यता देत आहे (अनंत काळासाठी!). यामुळे अणु पारदर्शकता आणि प्रामाणिकता सुनिश्चित होईल. जर त्यांनी याला सहमती दिली नसती, तर पुढील कोणतीही चर्चा झाली नसती, असेही ते म्हणाले. मात्र अमेरिकेच्या या दाव्याला इराणी अधिकाऱ्यांनी तात्काळ आव्हान दिले. प्रस्तावित अणु निरीक्षण व्यवस्थेच्या व्याप्तीबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकेई यांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावत सांगितले की, तेहरानने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) च्या निरीक्षणासाठी कोणतीही अंतिम सहमती दिलेली नाही.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘आमच्याकडे दोन मोठ्या गोष्टी आहेत. एक म्हणजे खुली होर्मुझ सामुद्रधुनी आणि दुसरी म्हणजे असा देश ज्याच्याकडे कधीही अण्वस्त्रे असणार नाहीत.’ सोमवारी अमेरिकेने इराणी कच्च्या तेलाच्या निर्यातीवरील काही निर्बंध शिथिल केले होते. यापूर्वी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी सांगितले होते की, इराणने संयुक्त राष्ट्रांच्या अणु निरीक्षकांना पुन्हा देशात येण्याची परवानगी देण्यास तयारी दर्शवली आहे. मात्र, चर्चेबाबत इराणची भूमिका स्पष्ट करताना इस्माईल बाकेई म्हणाले की, ‘अणु कार्यक्रमाबाबत अत्यंत प्राथमिक चर्चा झाली, पण तपशीलांवर कोणतीही सविस्तर चर्चा झालेली नाही.’
ट्रम्प यांनी असेही म्हटले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील नव्या राजनैतिक कराराच्या अंमलबजावणीनंतर होर्मुझ सामुद्रधुनीतील समुद्री वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी होर्मुझ सामुद्रधुनीतून 1.9 कोटी बॅरल तेलाची वाहतूक झाली. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. त्यामुळे तेलाच्या किमती कमी होत आहेत आणि जग अधिक सुरक्षित बनत आहे. सामुद्रधुनी पूर्णपणे खुली आहे. अमेरिका होर्मुझमार्गे कोणत्याही अडथळ्याशिवाय जहाजवाहतूक सुरू ठेवेल आणि या परिसरात लष्करी सज्जता कायम ठेवत पुढील नौदल निर्बंध टाळेल.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.