- राजेंद्र व्यास
गंगापूर - घर बांधण्यासाठी घेतलेल्या कर्जाचा मोबाईल नंबर बदलून देतो, असे सांगून अनोळखी व्यक्तीने लिंक पाठवून मोबाईल हॅक केला. त्यानंतर औषध विक्रेते व त्यांच्या आईच्या खात्यातून 1 लाख 60 हजार रुपये ऑनलाइन काढून घेतल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी झाली फसवणूक
नरसिंह कॉलनी, गंगापूर येथील औषध व्यापारी गोपाल विजय नावंदर वय 46 यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सकडून 15 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. 9 जून रोजी हप्ता भरण्याच्या दिवशी त्यांनी फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्याला मोबाईल नंबर बदलून देण्याची विनंती केली.
काही वेळातच अनोळखी नंबरवरून कॉल आला. समोरच्या व्यक्तीने हिंदीत बोलून कर्जाचा तपशील व मोबाईल नंबर बदलून देतो, असे सांगितले. व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवून ती डाऊनलोड करायला लावली. लिंक उघडताच गोपाल यांचा मोबाईल बंद झाला व हॅक झाला.
मोबाईल सुरू झाल्यावर त्यांनी फोन पे तपासले असता, आईच्या नावे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यातून 95 हजार व स्वतःच्या नावे असलेल्या आयडीबीआय बँक खात्यातून 65 हजार रुपये काढल्याचे दिसून आले.
सायबर हेल्पलाइनला तक्रार
गोपाल यांनी तातडीने सायबर हेल्पलाइन 1930 वर कॉल करून माहिती दिली. ऑनलाइन तक्रारही नोंदवली. परंतु पैसे परत न मिळाल्याने गुरुवार ता. 25 रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांचा सल्ला
कर्ज, बँक किंवा फायनान्स कंपनीचे नाव सांगून अनोळखी व्यक्ती लिंक पाठवत असेल तर ती डाऊनलोड करू नका. OTP, CVV कोणालाही सांगू नका. संशय आल्यास तातडीने 1930 वर कॉल करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.