मंचर - आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथे १०० खाटांच्या सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून २०० खाटांचे अद्ययावत सामान्य रुग्णालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, बुधवारी (ता.२४) यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. नव्या रुग्णालयासाठी डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, सफाई कामगार, सुरक्षा कर्मचारी आदींच्या एकूण २५९ पदांना मान्यता देण्यात आली आहे.
यामुळे आंबेगाव, खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील नागरिकांना ससून व औंध रुग्णालयांच्या धर्तीवर अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
सध्या मंचर येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत असून, येथे दररोज सरासरी ५०० ते ६०० रुग्ण उपचारासाठी नोंदणी करतात. मोफत सीटी स्कॅनसह विविध आरोग्य सेवा येथे उपलब्ध आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने तांबडेमळा येथे नव्या सामान्य रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या पदांना शासनाने मान्यता दिल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.
नव्याने उभारण्यात येणाऱ्या सामान्य रुग्णालयात हाड, त्वचा, कान-नाक-घसा, नेत्र, मनोविकार, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आदी विविध विभागांसाठी ४९ डॉक्टरांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्याचबरोबर परिचारिका, परिसेविका, रक्तपेढी तंत्रज्ञ, रुग्णवाहिका चालक, लघुटंकलेखक, कक्षसेवक, औषध निर्माता आदी पदांचाही समावेश आहे, अशी माहिती मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजीराव जाधव यांनी दिली.
महिला उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव
'तांबडेमळा येथील सामान्य रुग्णालय सुरू झाल्यानंतर मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे रूपांतर महिला उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे.'
- डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक औंध - पुणे
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.