पौड, ता. २६ ः पौड (ता. मुळशी) येथील एसटी बसस्थानक परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. स्वच्छतागृहाची दुरवस्था, इमारतीची पडझड, पाठीमागच्या बाजूकडील अस्वच्छता यामुळे ‘बडा घर पोकळ वासा’ अशी या स्थानकाची अवस्था दिसून येते.
पौडला परिवहन महामंडळाचे तालुक्यातील एकमेव बसस्थानक आहे. या बसस्थानकासाठी सुमारे तीन एकर जागा परिवहन महामंडळाच्या ताब्यात आहे. ४६ वर्षांपूर्वी बसस्थानकाची इमारती बांधली, तेव्हापासून केवळ एक एकर जागाच वापरात असून उरलेली जागा पडीक आहे. तीन एकर जागेला संरक्षक भिंत बांधली, परंतु त्याला प्लॅस्टर करण्यास मात्र मंडळ विसरले. बांधलेली इमारतही जीर्ण असून बांधबंदिस्ती खिळखिळी झाली आहे. इमारतीत चार व्यापारी दुकाने आहेत. परंतु गेल्या अठरा वर्षांपासून त्याचे शटर उघडले नाही. या इमारतीची आतील आणि समोरील बाजू स्वच्छ असते. प्रतीक्षालय तसेच आसन व्यवस्थाही बसण्यायोग्य आहे. मात्र इमारतीची पाठीमागची बाजू काटेरी झु़डपांनी वेढली गेली आहे. मद्यपींना दारू पिण्यासाठी ही जागा मोक्याची झाली आहे. दगडधोंडे आणि अस्ताव्यस्तपणामुळे पाठीमागच्या बाजूला अस्वच्छता पसरली आहे. इमारतीच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेला खासगी चारचाकी गाडीवाल्यांनी वाहनतळ बनविले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या गाड्यांना सुरळीत वाहतुकीसाठी अडथळा ठरतोय.
इमारतीच्या बाजूला असलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. त्याची स्वच्छता केली जात नसल्याने दुर्गंधी येते. एका कंपनीने येथे सशुल्क स्वच्छतागृह बांधले आहे. येथे कूपनलिका, पाण्याची साठवण टाकी, मोटर कनेक्शनही आहे. केवळ अनास्थेमुळे सुविधा केलेल्या असतानाही प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळत नाही.
येथील बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूला परिवहन महामंडळाच्या वतीने दोनशे झाडे लावली जाणार आहेत. तसेच दुकाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी टेंडर काढले असून, त्यातील दोन दुकानांचे बुकिंग झाले आहे. सशुल्क स्वच्छतागृह चालविणाऱ्या कंपनीला पंधरा दिवसांपूर्वीच बाजूच्या स्वच्छतागृहाची आणि इमारत परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी दिली आहे.
- विजय शेडगे, आगार व्यवस्थापक, पौड
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.