पुणे : कोथरूड येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने बालनाट्यगृह उभारले जात आहे. गेल्या तब्बल १२ वर्षापासून येथे काम सुरु असून, कधी राजकीय कुरघोड्यांचे ‘नाटक’ तर कधी प्रशासकीय दिरंगाईमुळे येथे काम रखडले आहे. त्यातच आता या ठिकाणी ६८.९५ लाख रुपयांच्या भित्तीचित्र लावण्यासाठीच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. हे नाट्यगृह कधी सुरु होणार याचे उत्तर स्थायी समिती अध्यक्षांना देता आले नाही.


यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या विस्तारीकरणांतर्गत हे काम २०१५ च्या सुमारास हाती घेण्यात आले होते. यात बाळासाहेब ठाकरे कलामंदिर आणि वाहनतळाची इमारत उभी करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. या कलामंदिरात सुमारे ४०० आसनक्षमतेचे बालनाट्यगृह असून, पहिल्या मजल्यावर बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे, दुर्मिळ छायाचित्रे, त्यांच्या भाषणांच्या चित्रफिती असे स्वरूप असलेले कायमस्वरूपी कलादालन, याशिवाय आरक्षण कार्यालय, मेकअप रूम, रंगीत तालमीसाठी छोटेखानी सभागृह, उपाहारगृह, स्वच्छतागृह अशा सुविधाही या वास्तूमध्ये असतील.


या प्रकल्पाचे काम सुरु झाले तरी अपुरा निधी, कोथरूडमधील तत्कालीन शिवसेना व भाजप नगरसेवकांमधील कुरघोड्या यामुळे हे काम रखडले. टप्प्याटप्प्याने या प्रकल्पाचे काम सुरु राहिले.


हे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी कलाकार आणि रसिकांनी वारंवार पाठपुरावा केला. त्यांना हे काम लवकरच पूर्ण होईल असे आश्‍वासन प्रशासनाकडून मिळत होते. पण राजकीय वादात ११ वर्ष झाले तरी हे काम अजूनही संपलेले नाही.


स्थायी समितीच्या बैठकीत बालनाट्यगृहात भित्तीचित्र बसविण्यासाठी भवन विभागाने ६९ लाख ९९ हजार ९९८ रुपयांच्या कामाचे पूर्वगणनपत्रक तयार केले. कामाच्या मूळ निविदा रकमेवर वस्तू व सेवा कर (जीएसटी) म्हणून सुमारे १०.५१ लाख रुपये अतिरिक्त खर्च होणार असून एकूण प्रकल्प खर्च ६८ लाख ९४ हजार ९९८ रुपयांपर्यंत जाणार आहे. या खर्चासाठी संबंधित अर्थशीर्षाखाली २०२६-२७ या आर्थिक वर्षात २.५५ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली.


दरम्यान गेल्‍या १२ वर्षापासून या प्रकल्पाचे काम रखडले आहे. त्याचे कारण का?, या प्रकल्पासाठी एकूण किती खर्च झाला? याची माहिती घेतली का असे भिमाले यांना विचारले असता ही माहिती उपलब्ध झाली नाही असे स्पष्टीकरण दिले. तसेच या प्रकल्पाचे उद्‍घाटन कधी होणार हे देखील ते सांगू शकले नाहीत.


भित्तीचित्राची माहितीच नाही


या बालनाट्यगृहात भित्तीचित्र बसविले जाणार आहेत. पण त्यामध्ये कशाची चित्रे असणार आहेत, त्याची संकल्पना काय आहे याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नाही. असे असतानाही स्थायी समितीच्या बैठकीत कोणतीही माहिती न घेता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.