पुणे : लोणावळा परिसरात लोहगड येथे झालेल्या केतन अग्रवाल याच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार आहे. राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना पुण्यात भेटल्यानंतर हे आश्वासन दिले.


या धक्कादायक खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी शुक्रवारी (ता. २६) पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी आर्त साद घातली. अग्रवाल कुटुंबीयांचे सांत्वन करत मुख्यमंत्र्यांनी, ‘या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध आहे. कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही,’ अशी ग्वाही दिली.


या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. दोषींना कठोरातील कठोर म्हणजे फाशीचीच शिक्षा व्हावी. तसेच, सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करत विधी व न्याय विभागाच्या सचिवांना तसा आदेश दिला. दरम्यान, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनीही या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती दर्शवली आहे.


सियाने इतका क्रूर मार्ग का निवडला?


पोलिस तपासात आरोपी सियाने ‘केतन तोतरे बोलत होता आणि डोक्यावर विग वापरत असल्याने तो आवडत नव्हता’ असा दावा केल्याचे समोर आले आहे. यावर वडील विशाल अग्रवाल यांनी तीव्र आक्षेप घेतला. ‘‘केतनला विग नव्हता तर केवळ एक छोटा पॅच होता, जे लग्नाआधीच मुलीच्या कुटुंबीयांना सांगितले होते. तिला नकार देण्याचा पूर्ण अधिकार होता, मग तिने इतका क्रूर मार्ग का निवडला?’’ असा सवाल मृत केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी उपस्थित केला.


सियाच्या घरच्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की ती पार्टीला जात नाही. आरोपी चेतन चौधरी आणि सियाचा भाऊ साहिल हे दोघे मित्र आहेत. या कटात दोघेच नसून, आणखी लोकांचा सहभाग असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.