पुणे : कोथरूड परिसरातील एका भूखंडावरील चटई क्षेत्र निर्देशांक (एसआय) व्यवहारात तब्बल ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बंगरुळ येथील एका नामांकित बांधकाम कंपनी आणि तिच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सोभा डेव्हलपर्स लिमिटेड, कंपनीचे पदाधिकारी मनीष वर्मा (रा. विमाननगर), सुरजित चंदा (रा. कोथरूड) आणि जगदीश नांगिनेनी रवी मेमन (दोघेही रा. बंगळूर) यांच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक रोहन किशोर पाटे (वय ३८, रा. सहकारनगर) यांनी तक्रार दिली आहे. मार्च २०१४ ते जून २०२६ दरम्यान हा प्रकार घडला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन पाटे हे ‘रोहन पाटे ग्रुप ऑफ कन्स्ट्रक्शन एलएलपी’चे भागीदार आणि अमित एंटरप्रायझेस हाउसिंग लिमिटेड’ चे संचालक आहेत. पाटे कुटुंबीयांच्या ‘अमित एंटरप्रायझेस हाउसिंग लिमिटेड’ या कंपनीसह जगदीश देशपांडे व इतरांची कोथरूड येथील सर्व्हे क्रमांक ७७/१ (पी) मधील सुमारे २७ हजार ४९९ चौरस मीटरसह २० हजार ८०३ चौरस फुटाची मालकी होती. त्यांही हा २०१४ मध्ये भूखंड बंगळूरमधील ‘शोभा डेव्हलपर्स’ या बांधकाम कंपनीला १०५ कोटी रुपयांना विकला होता.


या व्यवहारात एक हजार ७५३.६२ चौरस मीटर एफएसआय फिर्यादी यांच्यासाठी राखीव ठेवणे आवश्यक होते. मात्र आरोपींनी एफएसआय राखीव न ठेवता संपूर्ण एफएसआयचा वापर केला. याबाबत उच्च न्यायालयात आणि जिल्हा न्यायालयात विविध अर्ज व अपील करण्यात आले. उच्च न्यायालयाने या प्रकरणात एक हजार ७५३.६२ चौरस मीटरचा राखीव एफएसआय ठेवण्याचा आदेश शोभा डेव्हलपर्सला दिला होता. मात्र आरोपीच्या कंपनीने भूखंडावरील उपलब्ध एफएसआयपैकी जवळपास संपूर्ण एफएसआय वापरत केवळ ११.१५ चौरस मीटर एफएसआय शिल्लक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे राखीव एफएसआयचा वापर करून आपली ५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


न्यायालयाने दिला होता गुन्हा दाखल करण्याचा आदेश


याबाबत फिर्यादी यांनी कंपनी आणि तिच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने कोथरूड पोलिसांना गुन्हा दाखल करून त्याच्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिला होता. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अनिल माने करत आहेत.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.