रोहित कदम, साम टीव्ही


ऑपरेशन टायगर अंतर्गत बंडखोर 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदेच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतलं. या सर्व फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी नव्यानं मोर्चेबांधणीस सुरूवात केलीये. यवतमाळचे बंडखोर खासदार संजय देशमुखांच्या मतदारसंघातून जाहीर सभेला सुरूवात केल्यानंतर आता रविवारी उद्धव ठाकरेंनी बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव मतदारसंघात जाहीर सभा घेतलीये. या सभेत ठाकरेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. ज्याचं कारण देऊन ओमराजेंनी ठाकरेंची मशाल सोडून शिंदेंचं धनुष्यबाण हाती घेतलं त्यावरही उध्दव ठाकरेंनी बोट ठेवलं.


दरम्यान ठाकरेंवर कुठलीही टीका करणार नसल्याचं खासदार ओमराजे निंबाळकरांनी याआधीच स्पष्ट केलंय. मात्र, असं असलं तरी आपण कामातून उत्तर देणार असल्याचं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलंय.


खरंतर, ठाकरेंशी एकनिष्ठ मानले जाणारे ओमराजेंनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर ओमराजे निंबाळकर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाले होते. कारण वडील पवनराजे निंबाळकरांच्या हत्येनंतर ठाकरेंमुळेचे ओमराजेंना आमदारकी आणि खासदारकी मिळाली होती. ओमराजेंनी पक्ष सोडल्यानंतर आता ठाकरे मतदारसंघात कोणता नर्वा पर्याय देतात याची चर्चा सुरु असतानाच ओमरांजेंचे चुलत बंधू आणि ठाकरेसेनेचे सहसंपर्क प्रमुख मकरंदराजे निबाळकर हे सुद्धा सक्रीय़ झाले आहेत.


दुसरीकडे तळागाळात संपर्क असलेल्या ओमराजेंना रोखण्यासाठी ठाकरेंना पक्ष संघटना नव्यानं मजबूत करण्याची गरज आहे. ठाकरेंनी जिल्ह्यातील जुन्या शिवसैनिकांनाही साद घातलीये. त्यामुळे ओमराजेंनी जरी विकास निधीसाठी सत्ताधाऱ्यांची साथ धरली असली, तरी पुढील काळात त्यांच्यासमोर नवं राजकीय आव्हान उभं राहणार, हे जवळपास निश्चित. अशावेळी धाराशिवची जनता ओमराजेंच्या बंडखोरीला स्वीकारणार की ठाकरेंच्या 'मशाली'ला पुन्हा साथ देणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.