बीड : केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास घुले खून प्रकरणाची व्याप्ती आता वाढली असून, केज पोलिसांनी या गुन्ह्यातील दहाव्या आरोपीला लातूरमधून ताब्यात घेतले आहे. राजकुमार मोरे (रा. सोनीजवळा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या खळबळजनक खून प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभरात वातावरण ढवळून निघाले आहे.
विलास घुले याच्या हत्येनंतर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही याचे तीव्र पडसाद उमटले. आमदार धनंजय मुंडे आणि आमदार नमिता मुंदडा यांनी या प्रकरणी सभागृहात आवाज उठवत गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्यात आले असून केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी एम. व्यंकटराम हे या एसआयटीचे प्रमुख म्हणून तपास करत आहेत. पोलिसांनी यापूर्वीच ९ आरोपींना अटक केली असून मृताच्या भावाच्या पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्या अनुषंगाने एसआयटीने शनिवारी त्यांची तब्बल चार तास कसून चौकशी केली. त्यातून काही सुगावा लागल्यानंतर इतर मधील दहाव्या आरोपीला अटक झाल्याने या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.
गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त
विलास घुले यांच्या खून प्रकरणात आरोपींनी वापरलेली स्कॉर्पिओ कार (क्र. एमएच ४४ झेड ९५४२) केज पोलिसांनी जप्त केली आहे. या कारचा वापर थेट गुन्ह्यात झाल्याचे निष्पन्न झाल्याने ती सध्या पोलिसांच्या ताब्यात असून या माध्यमातून पुढील तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.