शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी बंडखोरी केली, या सर्व खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आता शिवसेना ठाकरे गटाकडे तीनच खासदार राहिले आहेत. दरम्यान पक्षात झालेल्या या बंडखोरीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहेत. त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे, ज्या ज्या मतदारसंघात खासदारांनी बंडखोरी केली, त्या -त्या मतदारसंघात उद्धव ठाकरे सभा घेत आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी धाराशीवचे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर बंडखोर खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. हे सर्व बंडखोर खासदार लटकणार आहेत, आमचे दोन खासदार दोन दिवसांपूर्वी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून आले आहेत. त्यांना आम्ही राज्यघटना दाखवली तर ते म्हणाले नाही माझ्याकडे आहे. मग आम्ही त्यांना, तो नियम दाखवला आहे. सध्या ते असा दावा करत आहेत, 9 पैकी सहा फुटले म्हणजे दोन तृतियांश झाले. माझ्या कानावर असंही आलं की यांचं कधीच ठरलं होतं. पण हा खासदार (ओमराजे निंबाळकर) अडून बसले होते. कारण त्यांना माहिती होतं पाच झालेत, 6 होईपर्यंत दोन तृतियांश होत नाहीत. म्हणून ताणून धरलं आणि भाव वाढवला, आणि मग तिकडे गेले, असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
पण जरी दोन तृतियांश गेले तरी काही होत नाही. ते खासदार फुटू शकत नाहीत. कारण कायदा असं सांगतो. जरी दोन तृतियांश संख्येने खासदार इकडचे तिकडे गेले तरी ते पक्षांतर करू शकत नाहीत. पक्षात विलीन होऊ शकत नाहीत, कारण पक्षात विलीन होण्याचा निर्णय हा पक्षाने घ्यावा लागतो आणि त्याला खासदारांनी दोन तृतियांशने पाठिंबा द्यावा लागतो, आता पाहूयात ओम बिर्ला काय करतायेत असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या खासदारांवर कारवाई होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.