झारखंडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे, पलामू जिल्ह्यात अवघ्या 10 दिवसांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आजारी पडल्यानंतर या कुटुंबाने नियमित वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी मांत्रिक आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला. या लोकांना एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून राखेचे सेवन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कदाचित यामुळेच या 5 लोकांचा मृत्यू झाला आहे.

मांत्रिकाच्या सल्ल्यामुळे पाच जणांचा मृत्यू?

डॉक्टरांच्या मते, पडवा प्रखंडातील सिक्का गावात राखेचे सेवन केल्यामुळेच संबंधितांची प्रकृती सातत्याने खालावत गेली असावी. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासाठी त्यांच्या शरिरातील महत्त्वाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. कुटुंबप्रमुख कुलदीप महतो यांचा 19 जून रोजी मृत्यू झाला. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मुलीचाही मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य वैद्यकीय उपचारांसोबतच लेस्लीगंज येथील पूर्णाडीह भागात मांत्रिकाकडून उपचार घेत होते. याच काळात त्यांनी राखेचेही सेवन केले. यानंतर 26 जून रोजी कुलदीप महतो यांची दुसरी मुलगी इंदू कुमारी हिचा मृत्यू झाला. 28 जून रोजी सून श्वेता कुमारी आणि 29 जून रोजी मुलगा नकुल महतो यांचाही रांची येथील रिम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

10 दिवसांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

अवघ्या दहा दिवसांत एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला. सध्या कुटुंबातील आणखी तीन सदस्य कुलदीप महतो यांची पत्नी लाखो देवी, एक मुलगा आणि एक नातू हे रांचीच्या रिम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सर्व रुग्णांच्या शरीराला सूज येत होती आणि त्यानंतर त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडत गेली.

आरोग्य विभागाकडून तपासाला सुरुवात

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन झारखंड आरोग्य विभागाच्या पथकाने सिक्का गाव आणि पूर्णाडीह येथे जाऊन तपास सुरू केला आहे. पथकाने सेवन केल्याचा संशय असलेल्या राखेचे नमुने गोळा केले असून, कुटुंबाने वापरलेले अन्नपदार्थ आणि इतर संभाव्य कारणांचीही तपासणी सुरू आहे. पलामूचे सिव्हिल सर्जन डॉ. अनिल कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, या कुटुंबातील लोकांना अनेक वेळा रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, त्यांनी वैद्यकीय उपचारांसोबत मांत्रिकाचा आधार घेतला. राखेचे सेवन केल्याची माहिती मिळाल्यानंतर तिचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.