न्यूझीलंड क्रिकेट टीमने टॉम लॅथमच्या नेतृत्वात कमाल केली आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला 2 वर्षांपूर्वी भारत दौऱ्यात कसोटी मालिकेत पराभूत केलं होतं. त्यानंतर आता न्यूझीलंडने इंग्लंडला त्यांच्याच घरात लोळवलं आहे. न्यूझीलंडने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात इंग्लंडचा 160 धावांनी धुव्वा उडवला आहे. न्यूझीलंडने यासह 3 सामन्यांची मालिका 2-1 आपल्या नावावर केली. न्यूझीलंडने या मालिका विजयासह जुना हिशोब चुकता केला. न्यूझीलंडने यासह गेल्या वेळेस इंग्लंडने घरच्या मैदानात केलेल्या पराभवाची अचूक परतफेड केली. या तिसऱ्या सामन्यात काय झालं हे जाणून घेऊयात.




इंग्लंडला सामन्यातील पाचव्या आणि अंतिम दिवशी विजयासाठी 170 धावांची गरज होती. तर न्यूझीलंडला 6 विकेट्स हव्या होत्या. जो रुट याच्यासारखा अनुभवी फलंदाज असल्याने इंग्लंडला विजयाची आशा होती. मात्र दिवसाच्या सुरुवातीलाच एकाच ओव्हरमध्ये इंग्लंडने 2 विकेट्स गमावल्या. न्यूझीलंडच्या नाथन स्मिथ याने एमिलियो गे आणि जो रुट या दोघांना आऊट केलं. या 2 विकेट्ससह इंग्लंड बॅकफुटवर गेली.





इंग्लंडचं दुसऱ्या डावात 212 धावांवर पॅकअप


त्यानंतर जेमी स्मिथ याने घट्ट पाय रोवले आणि गस एटकीन्सन याच्यासह भागीदारी केली. स्मिथने या दरम्यान अर्धशतक झळकावलं. या दोघांच्या भागीदारीमुळे इंग्लंडने दुसऱ्या सत्रापर्यंत सामना खेचला. दोघांमुळे इंग्लंडला आशा होती. मात्र या दोघांना फार वेळ टिकता आलं नाही. इंग्लंडची लंचनंतर पडझड झाली. न्यूझीलंडने इंग्लंडला 212 धावांवर ऑलआऊट केलं. इंग्लंडसाठी स्मिथने सर्वाधिक 60 धावा केल्या. तर न्यूझीलंडसाठी जॅक फॉक्स याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. ब्लेअर टिकनर याला झालेल्या दुखापतीमुळे फोक्सला कनक्शन सब्स्टीट्यूट म्हणनू संधी मिळाली. फोक्सने या सामन्यात एकूण 6 विकेट्स मिळवल्या.




बेन स्टोक्सच्या कारकीर्दीचा शेवट पराभवाने


दरम्यान न्यूझीलंडच्या विजयासह इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा शेवट हा पराभवाने झाला. बेन स्टोक्स याने तिसऱ्या सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं होतं. स्टोक्सने 2022 साली इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. तेव्हा इंग्लंडने न्यूझीलंडचा 3-0 ने सुपडा साफ केला होता. त्यानंतर आता 4 वर्षांनी न्यूझीलंडने त्या पराभवाची परतफेड केली आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.