पुणे : महापालिकेतील पथ विभाग आणि भवन विभागातील अभियंत्यांना मतदारयादी पडताळणी मोहिमेत सहभागी करून घेण्यात आल्याने या दोन्ही विभागांची कामे ठप्प झाली आहेत. आषाढी वारी, पावसाळ्यातील कामे खोळंबली आहेतच, शिवाय आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या कामावरही परिणाम होत आहे. त्यामुळे या अभियंत्यांना मतदार यादी पडताळणी मोहिमेतून मुक्त करा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.


केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात मतदार यादी पडताळणी मोहीम (एसआयआर) सुरु केली आहे. पुण्यात या कामासाठी महापालिकेचे कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यामध्ये पथ विभागाचे सुमारे २५ आणि भवन विभागाचे २० अभियंते या कामासाठी नियुक्त केले आहेत. पुण्यात पुढील आठवड्यात संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. त्याची तयारी पथ विभाग आणि भवन विभागाला करावी लागते. तसेच पावसाळ्यात शहरातील सुस्थितीत ठेवण्यासाठी पथ विभागावर मोठी जबाबदारी असते. गेल्या महिन्याभरात शहरात अनेक ठिकाणी खोदकाम सुरु होते. हे रस्ते अद्याप दुरुस्त झालेले नाहीत.


पुणे शहरात जानेवारी महिन्यात पुणे ग्रँड टूर ही अंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होणार आहे. त्यासाठी शहरातील रस्ते दुरूस्ती, सुशोभिकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत. पण पथ विभागाचे अभियंते मतदार यादीच्या कामात व्यस्त असल्याने ही सर्व कामे खोळंबली आहेत. त्यामुळे पथ विभाग व भवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन या दोन्ही विभागातील अभियंत्यांना या कामातून मुक्त करावे अशी विनंती केली आहे. त्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात विचार करू असे सांगितले आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.