आळंदी : मुख्यमंत्री वारकरी महामंडळातर्फे तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी वारीकरिता मानाच्या दहा पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान वितरित करण्याबाबतचा आदेश आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने कक्ष अधिकारी नागेश बामणे यांनी काढला. या अनुदानापोटी दोन कोटी 80 लाख रुपये अनुदान वितरण करण्यास शासकीय मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबवण्याकरिता 14 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यात आले. मागील दोन वर्षे आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या दहा पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये इतके अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. यंदाच्या वर्षीही आषाढी वारीसाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत मानाच्या दहा पालख्यांसोबत येणाऱ्या चौदाशे दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही चौदाशे दिंड्यांना वीस हजार रुपये प्रमाणे अनुदान वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता झाली असून त्या अनुषंगाने दोन कोटी 80 लाख रुपये वित्तीय अनुदान वितरित करण्याबाबत शासकीय मान्यता देण्यात येत आहे. हा निधी वितरित करण्यासाठी पुणे विभागातील विभागीय आयुक्त यांना नियंत्रण अधिकारी तसेच तहसीलदार, सामान्य प्रशासन, विभागीय आयुक्त पुणे विभाग यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात आले आहे.
वारकरी पालखी दरम्यान दिंड्या तसेच वारकऱ्यांच्या सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना पालखी मार्गावरील टोल नाक्यांवर शुल्क आकारले जाते, त्यामुळे दिंडी प्रमुख, पालखी सोहळे आणि सर्व वारकरी संस्थांना मोठा आर्थिक भार पडत आहे. वारकरी संप्रदायाच्या सेवाभावी परंपरेचा विचार करून आषाढी वारीच्या कालावधीमध्ये पालखी सोहळा, दिंडी व वारकरी सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व यात्रा वाहनांना राज्यातील सर्व टोलनाक्यांवर टोल माफी देण्यात यावी, अशी मागणी आणि दिंड्यांना अनुदान देण्याबाबत मागणी अन्य वारकरी संघटनांप्रमाणेच शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजकल्याण विभागाला तात्काळ कार्यवाही करण्याबाबतचे आदेश दिले होते.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.