माले : मुळशी धरण परिसरात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाने सोमवारी जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले. ठिकठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते खचणे, झाडे उन्मळून पडणे आणि पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. डोंगरवाडी (ता. मुळशी) येथे रस्त्याचा भराव वाहून गेल्याने पौड- माणगाव (पुणे- कोलाड) महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, हा मार्ग दुरुस्तीसाठी किमान १५ दिवस बंद राहण्याची शक्यता असल्याची माहिती तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी दिली.


रविवारी (ता. ५) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरवाडी येथे रस्त्याखालचा भराव वाहून गेला आणि रस्ता मोठ्या प्रमाणात खचला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक ठरत असल्याने प्रशासनाने तातडीने वाहतूक बंद केली. माले येथूनच वाहनांना परत पाठविण्यात येत असून, प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय जामगाव व मुळशी खुर्द येथे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. माले घाटातून वर आल्यानंतर क्रॉम्प्टन कंपनीजवळ झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पळसे धबधब्याच्या वळणाजवळ रस्त्याखालील मोरीचा भराव वाहून जाऊ लागल्याने तेथेही रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे.


दावडी- सारोळे गावाजवळ दरड कोसळून तीन घरे मातीखाली गाडली गेली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. दरड कोसळल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. सालतर खिंडीतही दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली असून, आडगाव येथे प्रमुख जिल्हा मार्ग क्र. २४ वरील आंबवणे- भांबर्डे- निवे रस्त्यावर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे.


अनियंत्रित उत्खननाचा फटका


मुसळधार पावसाबरोबरच डोंगर उतारांवर झालेल्या अनियंत्रित प्लॉटिंगमुळे मोठ्या प्रमाणावर माती, दगड आणि राडारोडा रस्त्यावर वाहून येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून, अशा अनियंत्रित उत्खनन व प्लॉटिंगमुळे निसर्गाचा समतोल बिघडत असल्याची तीव्र भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.


पंचायत समिती सदस्‍या काजल मोरे म्‍हणाल्‍या, ‘‘प्रशासनाने सर्व प्रभावित भागांत युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल, वन विभाग, पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने दरडी हटविणे व रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’’


डोंगरवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी केली असता रस्त्याखालचा सुमारे २० फूट भराव वाहून गेला असल्याचे आढळले. सध्याची परिस्थिती आणि सुरू असलेला पाऊस पाहता रस्ता दुरुस्तीसाठी किमान १५ दिवस लागतील. तोपर्यंत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुणे–कोलाड मार्ग बंद ठेवणे आवश्यक आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असून लवकरच अधिकृत आदेश जारी करण्यात येईल.


- विजयकुमार चोबे, तहसीलदार, मुळशी


डोंगरवाडी येथे रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून माले येथूनच वाहनांना परत पाठवले जात आहे. नागरिकांनी गरज नसल्यास प्रवास टाळावा आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा. दावडी येथे दरड कोसळलेल्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे.


- संतोष गिरीगोसावी, पोलिस निरीक्षक, पौड (ता. मुळशी)

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.