दावडी : खेड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक दावडी येथील भुईकोट किल्ल्याचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी दुपारी किल्ल्याच्या ईशान्य दिशेचा बुरुज अचानक ढासळला. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी किल्ल्यातील उत्तरेकडील भिंतही कोसळली होती. या सलग घटनांमुळे ऐतिहासिक वारसा धोक्यात आला असून ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
बडोद्याच्या श्रीमंत गायकवाड सरकारांचे मूळ गाव म्हणून दावडीची ऐतिहासिक ओळख आहे. गावातील भुईकोट किल्ला आणि त्यामधील प्राचीन राजवाडा हे गायकवाड घराण्याच्या इतिहासाच्या खुणा जपणारे महत्त्वाचे वास्तूवैभव मानले जाते. मात्र सातत्याने पडणारा मुसळधार पाऊस, दुर्लक्ष आणि संवर्धनाचा अभाव यामुळे या वास्तूंची मोठ्या प्रमाणात पडझड होत आहे.
सोमवारी दुपारी ईशान्येकडील बुरुजाचा मोठा भाग कोसळल्याने किल्ल्याचे अधिक नुकसान झाले. यापूर्वी राजवाड्याची उत्तरेकडील भिंत कोसळल्याने वास्तूची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
इतिहासप्रेमी आणि ग्रामस्थांनी पुरातत्त्व विभाग तसेच राज्य शासनाने तातडीने या ऐतिहासिक वास्तूची पाहणी करून संरक्षण व संवर्धनाची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास पुढील पावसाळ्यात किल्ला आणि राजवाड्याचे आणखी मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संवर्धनाची तातडीची गरज
दावडी (ता.खेड) येथील भुईकोट किल्ला आणि राजवाडा हा गायकवाड घराण्याच्या इतिहासाचा महत्त्वाचा वारसा आहे. मात्र देखभाल आणि दुरुस्तीअभावी या वास्तू दिवसेंदिवस जीर्ण होत आहेत. नुकत्याच झालेल्या पडझडीमुळे या ऐतिहासिक ठेव्याच्या संवर्धनासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दावडी ग्रामस्थ व इतिहासप्रेमींनी केली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.