पुणे - मद्यधुंद अवस्थेत चार वर्षांच्या चिमुकल्याचा नाक व तोंड दाबून निर्घृण खून केल्यावर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह घरातील पाण्याच्या टाकीत टाकणाऱ्या नराधमाला खेड-राजगुरुनगर अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सचिन दत्तात्रेय पिंगळे (वय ३७, रा. आंबेडकर वस्ती, चाकण, जि. पुणे) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात मृत मुलाच्या आईने तक्रार दिली होती. ही धक्कादायक घटना पाच एप्रिल २०१६ ला चाकणमधील आंबेडकर वस्ती परिसरात घडली होती.
मुलाला आरोपीची मुलगी तिच्या घरी घेऊन गेल्यापासून ते आरोपीच्या घराच्या टाकीतून त्याचा मृतदेह सापडेपर्यंतच्या घटनेशी संबंधित परिस्थितीजन्य पुराव्यांच्या साखळी सरकार पक्षाने सिद्ध केली आहे. आरोपीने गंभीर गुन्हा केला असून, चार वर्षांच्या निष्पाप मुलाचा जीव गेला आहे. या घटनेमुळे मुलाच्या पालकांना तीव्र मानसिक आघात सहन करावा लागला असून, ते या धक्क्यातून अद्यापही सावरू शकलेले नाहीत,’ असे निरीक्षण नोंदवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी हा निकाल दिला.
चाकण पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील एस. एस. वाघ यांनी दहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये मृत मुलाची आई, भाऊ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. ‘ही अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी घटना असून, गंभीर गुन्ह्यांमध्ये अवाजवी सहानुभूती दाखविल्यास न्यायव्यवस्था आणि कायद्यावरील जनतेचा विश्वास डळमळीत होईल,’ असे नमूद करत न्यायालयाने आरोपीला जन्मठेप सुनावली.
टाकीत आढळला होता मृतदेह -
तक्रारदार आणि आरोपी शेजारी होते. घटनेच्या दिवशी मद्याच्या नशेत असलेल्या आरोपीने तक्रारदारांच्या मुलाला घरी नेण्याची मागणी केली. त्याला तक्रारदारांनी नकार दिला. मात्र, एका अल्पवयीन मुलीने चिमुकल्याला आरोपीच्या घरी नेले. काही वेळाने तक्रारदार मोठ्या मुलासमवेत चिमुकल्याला शोधत आरोपीच्या घरी गेले असता, त्याने चिमुकला तेथे नसल्याचे सांगितले. तक्रारदारांच्या नातेवाइकांनी आरोपीच्या घरात तपासणी केली असता, आरोपीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्याला बाजूला करून रहिवाशांनी टाकीचे झाकण उघडले असता पाण्यात चिमुकल्याचा टी-शर्ट तरंगताना दिसला.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.