पुणे - फुरसुंगी परिसरातील एका व्यावसायिकाकडे ५० कोटी रुपयांची खंडणी मागून त्यांच्या कंपनीच्या प्रवेशद्वारावर गोळीबार करणाऱ्या बिश्नोई टोळीतील आरोपीसह तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. तसेच, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून तीन गावठी पिस्तूल आणि ३० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील फुरसुंगी परिसरातील एका व्यावसायिकास आणि त्यांच्या नातेवाइकाला हल्लेखोरांनी २२ जून रोजी फोन करून ५० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. हा फोन झाल्यानंतर हल्लेखोरांनी संबंधित व्यावसायिकाच्या कंपनीच्या प्रवेशद्वारावर येऊन गोळीबार केला होता.
याबाबत गुन्हे शाखेने तातडीने सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा माग काढला, मात्र आरोपी परराज्यात पसार झाले होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेची विशेष पथके हरियाणा, गुजरात, पंजाब आणि राजस्थानकडे रवाना झाली. पोलिसांनी पवन प्रकाशराम बारड (वय २४, रा. हनुमानगड, राजस्थान) याला दोन जुलै रोजी राजस्थानमधून अटक केली होती.
तपासादरम्यान, कंपनीची इत्थंभूत माहिती पुरविणारा कंपनीतील कामगार सत्यप्रकाश कालूराम शिलोरा (वय-२५, रा. हांडेवाडी) याला चार जुलै रोजी पुण्यातून अटक केली. त्यानंतर सात जुलै रोजी मुख्य आरोपी रवीकुमार राजेंद्रकुमार जांगडा (वय-३३, रा. सिरया, हरियाणा) आणि एका अल्पवयीन मुलाला पहाटे पाच वाजता हनुमानगड (राजस्थान) येथील रेल्वे फाटकाजवळून ताब्यात घेण्यात आले. आरोपी रवीकुमार जांगडा याच्याकडून एक पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुसे तसेच अल्पवयीन मुलाकडून दोन पिस्तूल आणि २० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.