- पांडुरंग साठे
कोळवण - मुळशी तालुक्यात रविवार तारीख ०५ पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे भात रोपवाटिका गाळ दगड गोटे यांनी गाडल्या आहेत. तर पुराचे पाण्यामुळे शेतीचे बांध तुटल्याने भात खाचरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी महसूल यंत्रणेला तातडीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश आज ता. ०७ रोजी दिले आहेत.
अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खरीप पिके पाण्याखाली गेली असून, शेतीची सुपीक माती वाहून जाणे, शेतबांध खचणे तसेच इतर शेतीसंबंधित नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. या सर्व नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेऊन शासनाच्या नियमानुसार पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत.
तहसीलदारांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागांना तातडीने भेटी देऊन पंचनाम्याचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचनाम्यांच्या आधारे पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत व नुकसानभरपाईची प्रक्रिया गतीने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुळशीतील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी मुळशी तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सचिन खैरे व पदाधिकारी यांच्याकडून नुकतीच करण्यात आली होती.
'मागील वर्षी सुद्धा जून ते ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात दोन वेळा पंचनामे झाले होते परंतु त्याची नुकसानभरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. आता या वर्षी शेतीचे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत, मागील वर्षीच्या शेती नुकसानीची भरपाई तातडीने शेतकऱ्यांना मिळावी नाही तर या वर्षी सुद्धा पंचनामे करण्याची प्रक्रिया एक फार्स ठरेल.'
- सचिन खैरे, तालुका प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुळशी.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.