पुणे - कर्जत-लोणावळा दरम्यान दरड कोसळून रेल्वे वाहतूक विस्कळित झाल्यानंतर प्रवास रद्द झालेल्या सुमारे ८० हजार प्रवाशांना मध्य रेल्वेने तातडीने ५ कोटी ९१ लाख रुपयांचा परतावा दिला. एकाच दिवशी ७९ हजार ७४७ प्रवाशांना परतावा देण्यात आला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत परतावा मिळालेल्या प्रवाशांची संख्या आणि वितरित रक्कम जवळपास दुप्पट झाली आहे.


कर्जत-लोणावळा रेल्वे मार्गावर सोमवारी (ता. ६) दरड कोसळल्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या. काही गाड्या अर्ध्या मार्गावरून परतविण्यात आल्या, तर काहींच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यामुळे हजारो प्रवाशांचा प्रवास खोळंबला. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने सर्व विभागांमध्ये परताव्याची प्रक्रिया वेगाने राबवून प्रभावित प्रवाशांना तातडीने रक्कम वितरित केली.


मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलैला ७९ हजार ७४७ प्रवाशांना एकूण ५.९१ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला. गेल्या वर्षी याच दिवशी ३८ हजार ६८७ प्रवाशांना तीन कोटी एक लाख रुपयांचा परतावा देण्यात आला होता. यंदा परतावा मिळालेल्या प्रवाशांच्या संख्येत ४१ हजार ६० जणांची, तर परताव्याच्या रकमेत २ कोटी ८९ लाख रुपयांची वाढ झाली आहे.


मुंबई विभागात ३७ हजार ३३० प्रवाशांना २ कोटी ८६ लाख रुपयांचा, तर पुणे विभागात २० हजार ९८२ प्रवाशांना एक कोटी ५६ लाख रुपयांचा परतावा देण्यात आला. परताव्याची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी स्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. तसेच, प्रवाशांच्या तक्रारी आणि परताव्याच्या अर्जांवर त्वरित कार्यवाही करण्यासाठी विशेष मदत कक्षही सुरू करण्यात आले होते.


परताव्याची ठळक आकडेवारी -


- एकूण परतावा : ५.९१ कोटी रुपये


- लाभार्थी प्रवासी : ७९,७४७


- गेल्या वर्षीचा परतावा : ३.०१ कोटी रुपये


- गेल्या वर्षी लाभार्थी : ३८,६८७ प्रवासी


- परताव्यात वाढ : २.८९ कोटी रुपये (९६ टक्के)


- लाभार्थी प्रवाशांमध्ये वाढ : ४१,०६० (१०६ टक्के)

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.