अकोला - पातूर तालुक्यातील नांदखेड फाटा येथे साडेतीन किलो सोन्याची नाणी अवघ्या ५० लाख रुपयांत विकण्याचे आमिष दाखवून कोल्हापूरच्या एका हॉटेल व्यावसायिकाची १५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्यवहारापूर्वी तपासणीसाठी दिलेले एक नाणे खरे असल्याने विश्वास बसला; मात्र व्यवहारानंतर मिळालेली उर्वरित नाणी बनावट निघाल्याने हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.


कोल्हापूर येथील युवराज चोंदोबा कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गणेश इंगळे नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधून घर पाडताना नातेवाईकाला सोन्याने भरलेली भरणी सापडल्याचे सांगितले. त्यात साडेतीन किलो सोन्याची नाणी असून ती बाजारभावापेक्षा कमी दरात, ५० लाख रुपयांत विकण्याची तयारी असल्याचे सांगत आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच आपण पूर्वी कांबळे यांच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी आलो होतो, असे सांगून जवळीक निर्माण केली. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर नाण्यांचे फोटोही पाठविण्यात आले.


व्यवहारापूर्वी तपासणीसाठी देण्यात आलेले एक नाणे सोनाराकडे तपासले असता ते खरे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे विश्वास बसलेल्या कांबळे यांनी ४ जुलै रोजी कोल्हापूरहून पातूर येथे येऊन नांदखेड फाटा परिसरात आरोपीसोबत व्यवहार केला. यावेळी त्यांनी १५ लाख रुपये रोख दिले. ही रक्कम उभी करण्यासाठी घरातील सोने तारण ठेवून बँकेतून गोल्ड टर्म लोन घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पैसे स्वीकारल्यानंतर आरोपीने सुमारे ३ किलो ३०० ग्रॅम वजनाची कथित सोन्याची नाणी दिली.


मात्र पुढील तपासणीत ती सर्व नाणी बनावट असल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्याचे सर्व मोबाईल क्रमांक बंद असल्याचे समोर आले. याप्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता ती स्वीकारण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यानंतर त्यांनी थेट अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.


यावेळी पोलीस अधीक्षकांनी पातूर पोलिसांना तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना तीन दिवसांत अटक करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे तसेच फसवणुकीतील मुद्देमाल जप्त करण्याचे निर्देश दिल्याची माहिती तक्रारदाराने दिली. त्यानुसार पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आरोपींवर कठोर कारवाई करून फसवणुकीची रक्कम परत मिळवून द्यावी आणि अशा प्रकारच्या टोळ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवराज कांबळे यांनी केली आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.