मुंबई/जळगाव : राज्यात पोलिसांकडून ड्रग्जविरोधी कारवाईला जोर आला असून मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात देखील ड्रग्जविरुद्ध कारवाई जोरात सुरू आहे. आता, मध्यरात्री रचलेल्या सिनेस्टाईल आणि थरारक सापळ्यात जळगावच्या (Jalgaon) स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व जिल्हापेठ पोलिसांनी एमडी तस्करी करणाऱ्या दोघांना जेरबंद केले. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास जी.एस. ग्राऊंड परिसरात ही थरारक कारवाई करण्यात आली. दुसरीकडे, मुंबईत नेस्को औषधे ओव्हरडोस प्रकरणी 14 व्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
जळगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत 56.29 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) आणि मोटारसायकलसह एकूण 3 लाख 6 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला. त्यानंतर मोटारसायकलवरून आलेल्या तिघांना अडविण्याचा प्रयत्न होताच एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला. मात्र पोलिसांनी जयेश देविदास तायडे आणि हितेंद्र शिवाजी परदेशी यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत 56.29 ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले. प्राथमिक चौकशीत फरार आरोपी भैय्या सोनवणे याच्याकडून विक्रीसाठी एमडी घेतल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेस्को ड्रग्स ओव्हरडोस प्रकरणात 14 वा आरोपी अटक करण्यात आला आहे. मुंबईच्या वनराई पोलिसांची नेस्को ड्रग ओव्हरडोस प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई केली. याप्रकरणातील 14 वा आरोपी नितेश उर्फ ‘निक’ खेमलानी याला अटक करण्यात आलीय. निक हा मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या महेश उर्फ ‘मार्क’ खेमलानीचा जुळा भाऊ आहे. स्थानिक न्यायालयाने निकला 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून आर्थिक व्यवहारांच्या तपासातून आरोपीपर्यंत पोलिसांचा तपास पोहोचला आहे. आधी अटक करण्यात आलेल्या आरोपींसोबत आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे. यापूर्वी दिपेश हेमवानी यालाही या प्रकरणात अटक; तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. वनराई पोलिसांनी 12 आरोपींविरोधात 3,547 पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. दोषारोपपत्रात 109 साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील पुरावे समाविष्ट आहेत. आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुराव्यांचा तपास सुरू असून आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
इंदापूर तालुक्यातील बावडा येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. बावडा-इंदापूर रोडवरील बसस्टॉप परिसरात गावठी पिस्तुल बाळगून उभा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत शाहरुख इस्माईल मुजावर याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत सुमारे 50 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.