- प्रज्वल रामटेके
पुणे - ‘डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करणे आणि सैनिक म्हणून राष्ट्रसेवेसाठी सदैव सज्ज राहणे, ही दुहेरी जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे. डॉक्टरचा पांढरा कोट आणि भारतीय सशस्त्र दलाचा गणवेश ही जगातील सर्वाधिक सन्मानाची दोन प्रतीके परिधान करण्याचा बहुमान तुम्हाला मिळाला आहे. त्यामुळे व्यावसायिक कौशल्य, शिस्त, प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि सेवाभाव जपत राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्या,’ असे आवाहन ‘सशस्त्र दल वैद्यकीय सेवे’च्या (एएफएमएस) महासंचालक सर्जन व्हाइस ॲडमिरल आरती सरीन यांनी केले.
vice admiral arti sarin
‘सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालया’च्या (एएफएमसी) ६०व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा शुक्रवारी (ता. १०) ‘कॅप्टन देवाशिष शर्मा कीर्ती चक्र परेड मैदानावर’ उत्साहात पार पडला. त्या वेळी छात्रांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी एएफएमसीचे संचालक व कमांडंट लेफ्टनंट जनरल पंकज पी. राव, डेप्युटी कमांडंट अधिष्ठाता मेजर जनरल अतुल सेठ यांच्यासह माजी वरिष्ठ अधिकारी, शिक्षक, पालक आणि उपस्थित होते.
व्हाइस ॲडमिरल सरीन यांनी आढावा अधिकारी म्हणून या परेडची सलामी स्विकारली. या वेळी १४१ वैद्यकीय पदवीधरांना सशस्त्र दल वैद्यकीय सेवेत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. यामध्ये भारतीय लष्करात ११२, नौदलात १२ आणि हवाई दलात १७ अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. या संचलनाचे नेतृत्व लेफ्टनंट निखिल कुमार झा यांनी केले.
व्हाइस ॲडमिरल सरीन म्हणाल्या, ‘‘वैद्यकीय शिक्षणातील इंटर्नशिप हा शेवटचा टप्पा नसून, प्रत्यक्षात डॉक्टर घडण्याची खरी सुरुवात आहे. पुस्तकांबरोबरच रुग्ण, परिचारिका, तंत्रज्ञ आणि अनुभवी सहकाऱ्यांकडूनही शिकण्याची तयारी ठेवा. समस्या सोडविण्याची क्षमता, संवादकौशल्य आणि संघभावना याच तुमच्या भावी सेवेत महत्त्वाच्या ठरणार आहेत.
रोबोटिक्स, प्रिसिजन मेडिसिन, जीनोमिक्स, डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने वापर वाढत असला, तरी संवेदनशील डॉक्टरच्या स्पर्शाची जागा कोणतेही यंत्र घेऊ शकत नाही. तंत्रज्ञान हे तुमचे साधन आहे; मात्र माणुसकी, सहानुभूती आणि करुणा हीच तुमची खरी ताकद असली पाहिजे.’
अनन्या फडके यांना राष्ट्रपती सुवर्णपदक
या दिक्षांत संचलन सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सर्वांगीण विद्यार्थी म्हणून पुण्याच्या फ्लाइंग ऑफिसर अनन्या फडके यांना राष्ट्रपती सुवर्णपदक आणि कलिंगा ट्रॉफी प्रदान करण्यात आली. तसेच शैक्षणिक गुणवत्ता, नेतृत्व, क्रीडा आणि अन्य उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही विविध पदके आणि पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
‘स्वार्थापेक्षा सेवा' हा जीवनमंत्र जपा
‘नेतृत्व हे पदामुळे मिळत नाही, तर जबाबदारी स्वीकारण्याची तयारी, कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि सहकाऱ्यांचा विश्वास संपादन करण्याच्या वृत्तीतून ते घडते. प्रत्येक अधिकाऱ्याने ‘स्वार्थापेक्षा सेवा’, ‘प्रतिकूल परिस्थितीतही उत्कृष्ट कामगिरी’ आणि ‘नीतिमत्तेशी कोणतीही तडजोड नाही’ हा जीवनमंत्र अंगीकारावा. त्याचबरोबर शारीरिक तंदुरुस्ती, वेळेचे प्रभावी नियोजन, आर्थिक शिस्त, संशोधनाची आवड आणि आयुष्यभर नवनवीन गोष्टी शिकत राहणे आवश्यक आहे.
- सर्जन व्हाइस ॲडमिरल आरती सरीन, महासंचालक, ‘सशस्त्र दल वैद्यकीय सेवे’च्या (एएफएमएस)
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.