बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






कामारी जिल्हा परिषद शाळेत रोजच शाळेच्या वेळेवर न येता तब्बल एक ते दिड तास उशिरा येणार्‍या जिल्हा परिषद शिक्षकांना पालकांनी घेराव घालत जाब विचारला. या लेटलतिफ शिक्षकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी गावकर्‍यांनी केली.


हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी जिल्हा परिषद शाळेत सोमवारी शिक्षकांच्या कथित उशिरा हजेरीवरून पालक आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. शाळेची वेळ होऊनही काही शिक्षक वेळेवर शाळेत न आल्याचा आरोप करत संतप्त पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर संबंधित शिक्षकांना घेराव घालत जाब विचारला. सकाळी शाळा सुरू होण्याची वेळ उलटून गेल्यानंतरही अनेक विद्यार्थी शाळेच्या गेटबाहेर शिक्षकांची वाट पाहत उभे असल्याचे चित्र पाहून पालकांचा संताप अनावर झाला.


ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सकाळी नऊ वाजूनही काही शिक्षक शाळेत हजर झाले नव्हते. विद्यार्थी वेळेवर शाळेत येतात, मात्र शिक्षकच वेळेचे पालन करत नसतील तर विद्यार्थ्यांना शिस्तीचा संदेश कसा मिळणार? असा संतप्त सवाल उपस्थित करत पालकांनी संबंधित शिक्षकांकडे खुलासा मागितला. यावेळी काही काळ शाळेच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


कामारी येथील प्रकार हा केवळ एका शाळेपुरता मर्यादित नसून हिमायतनगर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्याचा आरोप पालकांनी केला. काही शिक्षक दूरवरून अपडाऊन करत असल्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित अध्यापनाचा लाभ मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे तालुकाभरातील शाळांमध्ये अचानक तपासणी मोहीम राबवून शिक्षकांच्या उपस्थितीची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी पालकांनी सात वाजताची शाळा असताना सव्वाआठ ते साडेआठ वाजता हे शिक्षक आले. त्यामुळे चारचाकी गाडीतून आलेल्या या शिक्षकांना पालकांनी धारेवर धरले. गाडी वेळेवर आली नाही, घरुन निघायला उशिर झाला, अशी वेगवेगळी कारणे त्यांनी दिली. यावर पालक आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.