सातारा : सध्या पंढरीची वारी सुरू असून मानाच्या पालखीसह हजारो दिंड्यांसह लाखो वारकरी पंढरीची वाट चालत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे साताऱ्यात (Satara) आगमन होत असल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे. त्यातच, माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत पोलिसांची (Police) बनावट वेशभूषा करून नागरिकांना लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.
सांगली आणि कोल्हापूर येथील आरोपी पुसेगाव पोलिस असल्याची बतावणी करुन रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावत होते. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावून कारवाईची भीती दाखवत वाहनचालकांकडून पैसे देखील उकळत होते. वर्धनगड येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ सुरू असलेला हा प्रकार गोपनीय माहितीच्या आधारे पुसेगाव पोलिसांनी उघडकीस आणला. या कारवाईत चार पुरुष आणि तीन महिलांना अटक करण्यात आली असून दोन चारचाकी वाहने, आठ मोबाईल, रोख रक्कम असा तब्बल 21 लाख 19 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरीसह पालखी मार्गावरही चोरट्यांवर पोलिसांच्या करडी नजर आहे.
पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक होत असून अटकेतील आरोपींचा अधिक तपास सुरू आहे. यापूर्वी कुठल्या गुन्ह्यात आरोपींचा सहभाग आहे का, त्यांच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का, याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
पंढरीच्या वारीच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यात पालखी कालावधीत कायदा व सुव्यवस्थेसाठी 97 गुन्हेगारांना तडीपार (जिल्हा बंदी) करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधात्मक कारवाई राबविण्यात आली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.