पुणे - वाढत्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी आणि शहराच्या शाश्वत विकासासाठी राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती दिली आहे. उन्नत मार्ग, रिंगरोडचे जाळे आणि ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून होणारे शहराचे विकेंद्रीकरण यामुळे आगामी काळात पुणे केवळ राज्याचे नव्हे, तर देशाचे प्रमुख ‘ग्रोथ इंजिन’ बनेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांच्यावतीने तीन उन्नत महामार्गाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजूषा नागपुरे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, हेमंत रासने, भीमराव तापकीर, अमित गोरखे, विक्रम काकडे, राहुल कुल, बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, शंकर जगताप, ज्ञानेश्वर कटके आदी मान्यवर उपस्थित होते.
पुण्याच्या विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘पुण्याची वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेता, भविष्याचा वेध घेणारे नियोजन आत्तापासूनच करणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकारने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रासाठी एकात्मिक विकास आराखडा हाती घेतला आहे. केवळ रस्ते बांधणीवर न थांबता, भविष्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पांचाही विचार करून रस्त्यांचे ‘ॲडव्हान्स प्लॅनिंग’ केले जात आहे. यामुळे उन्नत मार्गांच्या उभारणीतच मेट्रोसाठीची पायाभूत व्यवस्था निर्माण केली जाईल. ज्यामुळे भविष्यातील खर्चात तब्बल ४० टक्क्यांची बचत होईल.
पुणे-शिरूर मार्गासाठी साडेसात हजार कोटी, तर तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गासाठी जवळपास चार हजार कोटी रुपयांची तरतूद करून येथील वाहतूक कोंडी फोडण्यावर शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय, पुण्याचे सांडपाणी १०० टक्के शुद्ध करून, त्याचा पुनर्वापर करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरही काम सुरू आहे. यामुळे भविष्यातील पुण्याचा पाणीप्रश्न कायमचा निकाली निघेल.’
पुण्याच्या पायाभूत सुविधांबद्दल मुख्यमंत्री म्हणाले
शहराबाहेरून जाणारी जड वाहतूक वळवण्यासाठी १७३ किमीचा आउटर रिंगरोड आणि ८६ किमीचा इनर रिंगरोडचे काम गतीने सुरू असून, पुढील दोन वर्षांत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
पुरंदर विमानतळाला जोडण्यासाठी दिवे घाटात ‘ट्विन टनेल’ (जुळे बोगदे) तयार करून मेट्रो आणि रस्त्यांची थेट कनेक्टिव्हिटी देण्याचे नियोजन आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरावरील ताण कमी करण्यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून नव्याने ‘टाऊनशिप्स’ विकसित करून लोकसंख्येचे योग्य विकेंद्रीकरण केले जात आहे.
पुणे शहरांतर्गत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ३६ किलोमीटर लांबीचा वर्तुळाकार उन्नत मार्ग लवकरच मार्गी लावला जाणार आहे.
जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने पुण्याचे १०० टक्के सांडपाणी शुद्ध करण्याचा प्रकल्प राबवला जात असून, या पाण्यामुळे नद्या आणि तलाव प्रदूषणमुक्त होणार आहेत.
टेकड्या आणि घाटांचा विचार करता, वाहतूक अधिक वेगवान करण्यासाठी पुण्यात ‘पाताळ लोक’ या संकल्पनेवर आधारित बोगद्यांचे जाळे विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागारांची मदत घेतली जात आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.