पुणे - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ‘नीट-युजी’ या प्रवेश परीक्षेतील गोंधळाचे सत्र अद्यापही कायम आहे. पुण्यातील एका विद्यार्थ्याला ७२० पैकी उत्तरपत्रिकेनुसार ७०७ गुण मिळणे अपेक्षित होते. मात्र, स्कोअरकार्डवर त्याचे केवळ २१७ गुण दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी- पालकांना पुन्हा एकदा मानसिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. निकालातील गुणांच्या गोंधळाबाबत पालक आता थेट न्यायालयातच धाव घेण्याच्या तयारीत आहेत.
यंदा ‘नीट’ पेपर फुटीमुळे संपूर्ण परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात आली. परीक्षा झाल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) प्रश्नपत्रिकेची उत्तरसूची जाहीर केली. त्यानुसार पुण्यातील आर्यन चव्हाण या विद्यार्थ्याला ७२० गुणांपैकी ७०७ गुण मिळणे अपेक्षित होते.
दरम्यान, त्यानंतर निकालाच्या दिवशी १६ जुलैला अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली. त्यानुसार आर्यनला ७२० गुणांपैकी पहिल्या उत्तरसूचीनुसार अपेक्षित असणारे ७०७ गुण हे थेट २१७ गुणांवर आले. त्यानंतर निकाल जाहीर झाला आणि त्यात त्याच्या स्कोअरकार्डवर २१७ गुण आले, असे आर्यनचे वडील ब्रह्मदास चव्हाण यांनी सांगितले.
चव्हाण म्हणाले, ‘आर्यनला ७०० गुणांपेक्षा जास्त गुण मिळतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार ‘एनटीए’ने सुरुवातीला जाहीर केलेल्या उत्तरसूचीनुसार त्याला ७२० गुणांपैकी ७०७ गुण मिळणे अपेक्षित होते. परंतु, निकालाच्याच दिवशी अंतिम उत्तरसूची जाहीर केली, त्यात आणि प्रत्यक्ष निकालात त्याला २१७ गुण मिळाले आहेत.
‘एनटीए’च्या गुणांच्या गोंधळाबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल. आर्यन हा नऱ्हे येथील अभिनव महाविद्यालयाचा विद्यार्थी असून त्याला बारावीला (सीबीएसई) ७६ टक्के गुण मिळाले आहेत. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. ‘नीट’ परीक्षेच्या गुणांच्या गोंधळाबाबत ‘एनटीए’कडे ईमेलद्वारे तक्रार देखील केली आहे. मात्र, अद्याप ईमेलला कोणताही प्रतिसाद आलेला नाही.’
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.