पिरंगुट - सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाच्या जिद्दीवर मुळशीतील आंदगाव येथील शैलेश भगवान शिंदे यांनी इंग्लंडमधील शेपशेड (लेस्टरशायर) येथे टाउन काउन्सिलर म्हणून निवडून येत इतिहास घडवला आहे. शहराचे पहिले हिंदू काउन्सिलर आणि आजवरचे सर्वांत तरुण काउन्सिलर होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला असून, एका मराठी युवकाची ही कामगिरी तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


शैलेश यांचा जन्म मुळशीतील शिंदेवाडी येथील एका शेतकरी कुटुंबात झाला. वडील भगवान शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थितीत त्यांना उच्च शिक्षण दिले. मराठी माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या शैलेश यांना शालेय वयात नाटक, खेळ आणि सामाजिक कामांची आवड होती. दहावीनंतर त्यांनी पुण्यातील एकलव्य पॉलिटेक्निकमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर इटन कॉर्पोरेशन कंपनीने त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रायोजित केले. बीआयटीएस पिलानीमधून पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडची वाट धरली.


लहानपणापासून शालेय विषयाशिवाय इंग्रजी भाषेचा कोणताही संपर्क नसल्यामुळे इंग्रजीचा फारसा सराव नसतानाही शैलेश यांनी जिद्दीने लेस्टर विद्यापीठातून ‘एमएस्सी इन ॲडव्हान्स्ड मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ मॅनेजमेंट’चे शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केले. सध्या ते ‘रोल्स-रॉयस एरोस्पेस’ या नामांकित कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत असून, चार्टर्ड इंजिनिअर देखील आहेत.


कोविड काळात त्यांनी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट उत्पादनात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना डॉ. मार्क सिम्स मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय ते रॉयल ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर असून, लेस्टर विद्यापीठाच्या इंडस्ट्री ऍडव्हायसरी बोर्डाचे को-चेअर म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. तिथे ते अभ्यासक्रम, उद्योग व शिक्षण भागीदारीचे धडे देऊन इंजिनिअर्सच्या पुढील पिढीला मार्गदर्शन करतात.


शिक्षणाच्या जोरावर आपण परिस्थिती बदलू शकतो. मुळशीतील शेतकरी कुटुंबात जन्मलेला आणि मराठीत शिकलेला मी, कर्ज काढून परदेशात आलो. ज्या देशाची भाषा अवगत नव्हती, तिथे आज सामाजिक कार्य करत आहे. मुळशीची जी अनावश्यक ओळख निर्माण होऊ लागली आहे, ती पुसण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही.


- शैलेश शिंदे

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.