पुणे - गर्भवती महिलांमध्ये वेळेवर तपासणी, उच्चजोखमीच्या गर्भधारणेचे लवकर निदान, प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या उपचार सुविधांचा विस्तार तसेच जनजागृतीचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, महापालिका क्षेत्रातील मातामृत्यूच्या संख्येत गेल्या चार वर्षांत लक्षणीय घट झाली आहे.
२०२१-२२ मध्ये १०३ असलेली मातामृत्यूची संख्या एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ३९ टक्क्यांनी घट झाली असून ती ६२ वर आली आहे. या आकडेवारीतून मातामृत्यू रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांना यश येत असल्याचे स्पष्ट होत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गर्भधारणा नोंदणीचे प्रमाण वाढणे, नियमित प्रसूतिपूर्व तपासण्या, रक्तदाब, रक्तक्षय, मधुमेह यांसारख्या गुंतागुंतींचे वेळेत निदान, उच्चजोखमीच्या गर्भवती महिलांचे विशेष निरीक्षण तसेच संस्थात्मक प्रसूतींचे वाढलेले प्रमाण यामुळे मातामृत्यू कमी होण्यास मदत झाली आहे.
महापालिकेने शासकीय आणि खासगी रुग्णालयांशी समन्वय वाढवून रेफरल व्यवस्था अधिक सक्षम केली आहे. गंभीर रुग्णांना तातडीने उच्चस्तरीय उपचार उपलब्ध करून देणे, प्रशिक्षित डॉक्टर व परिचारिकांची उपलब्धता आणि आधुनिक निदान सुविधा यांचाही यामध्ये महत्त्वाचा वाटा असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
मातामृत्यू रोखण्यासाठी प्रमुख उपाययोजना
गर्भधारणेची पहिल्या तीन महिन्यांत नोंदणी व नियमित प्रसूतिपूर्व तपासण्या
सुरक्षित व संस्थात्मक प्रसूतींना प्रोत्साहन
उच्चजोखमीच्या गर्भधारणेची लवकर ओळख व संदर्भसेवा
रक्तक्षय (ॲनिमिया), उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांचे वेळेवर निदान व उपचार
गर्भवतींना आयर्न-फॉलिक ॲसिड, कॅल्शिअम आणि आवश्यक लसीकरण
गरजेनुसार सिझेरियनसह तातडीच्या प्रसूती सेवा उपलब्ध
गुंतागुंत आढळल्यास तातडीने उच्चस्तरीय रुग्णालयात रेफरल व्यवस्था
रुग्णवाहिका आणि आपत्कालीन वाहतूक सुविधा
मातामृत्यूचा आढावा घेत कारणांचा अभ्यास व सुधारणा
मातामृत्यूची आकडेवारी
२०२१-२२ : १०३
२०२२-२३ : ९०
२०२३-२४ : ८९
एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ : ६२
मातामृत्यू रोखण्यासाठी पहिल्या तीन महिन्यांत गर्भधारणेची नोंदणी, प्रसूतिपूर्व तपासण्या, रक्तक्षयावर उपचार आणि गुंतागुंत आढळताच तातडीने तज्ज्ञांकडे रेफर करणे महत्त्वाचे असते. गर्भधारणेची वेळेत नोंदणी, नियमित प्रसूतिपूर्व तपासण्या, उच्चजोखमीच्या गर्भवतींची लवकर ओळख, रक्तक्षयावर उपचार, सुरक्षित संस्थात्मक प्रसूती आणि गरज पडल्यास तातडीने रेफरल केल्यामुळे मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश मिळत आहे. गर्भवतींनी कोणतीही लक्षणे दुर्लक्षित न करता नियमित तपासणी करून घ्यावी.
- डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, महापालिका
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.