अहिल्यानगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नीट पेपरफुटी, सीजेपीचं आंदोलन आणि नवी दिल्लीत विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला लाठीचार्ज यामुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले की सरकारला जनतेची गरज राहिली नाही असं दिसतंय.जनतेची जी काय इच्छा आहे, हे समजून घेण्याची सरकारला गरज वाटत नाही. आंदोलनातील आवाज जनतेचा आणि विद्यार्थ्यांचा आहे, तो आक्रोश समजून घेण्याची सरकारची इच्छा नसल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. ते संगमनेर येथे बोलत होते.
जनतेचा आणि विद्यार्थ्यांचा हा आक्रोश समजून संवाद देखील साधण्याची इच्छा सरकारची दिसत नाही.बाळ रडल्यावर आई जशी जवळ जाते तसे सरकारने गेले पाहिजे ही अपेक्षा असते. आम्ही कोणतेही फंडे वापरून निवडून येतोच अस सरकारला वाटते. त्यामुळं यांच्यात तो गर्व आलाय,वापरा आणि टाकून द्या अशी सरकारची भूमिका असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.
राहुल गांधी अनेक दिवसापासून देशासह बाहेर देशात देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षांनी सरकारच्या विरोधात आवाज देखील उठवला आहे. विरोधी पक्षांनी पुढे आलेच पाहिजे मात्र जनतेने देखील आता सरकारची भूमिका ओळखली पाहिजे, अशी अपेक्षा थोरात यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब थोरात म्हणाले की जनतेने विरोधी पक्षांना साथ देणं गरजेचं आहे. आज दुसऱ्याचे घर जळतेय उद्या तुमचे देखील जळू शकते हे जनतेने समजून घेण्याची गरज आहे. लोकशाही वाचविण्याचा संग्राम पुन्हा एकदा सुरू झालाय असं वाटत असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुरु असलेल्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमावर देखील बाळासाहेब थोरात यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की BLO यांनी घरोघरी जाऊनच फॉर्म भरून घेतले पाहिजे. जर कोणी घरी नसेल तर तीनदा त्या व्यक्तीच्या घरी गेले पाहिजे. सगळ्या पक्षांचे BLA 1 आणि 2 आहेत.त्यांनी देखील त्यांना मदत केली पाहिजे. मतदार यादी हा लोकशाहीचा पाया आहे. बंगाल सारखे मतदार यादीचा घोळ आपल्याकडे घडू नये यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे अशी अपेक्षा बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.