महागाव - येथील महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी शकुंतला इंगोले यांना अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्ती करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) यवतमाळ पथकाने बुधवारी सायंकाळी रंगेहात पकडले. ही कारवाई महागाव शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील त्यांच्या राहत्या घरी करण्यात आली. कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानी झाडाझडतीही घेतली.
प्राथमिक माहितीनुसार, कोमल बंडू मस्के यांनी अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती करून देण्यासाठी शकुंतला इंगोले यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर लाचेची रक्कम १० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.
पूर्वनियोजित सापळ्यानुसार बुधवारी सायंकाळी पहिला हप्ता म्हणून ५ हजार रुपये महागाव येथील त्यांच्या राहत्या घरी देण्यात आले. इंगोले यांनी ही रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या यवतमाळच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
कारवाईनंतर पथकाने त्यांच्या घराची सखोल झाडाझडती घेतली. या तपासादरम्यान विविध कागदपत्रे व अन्य बाबींची तपासणी करण्यात आली असून, त्याचा पंचनामा करण्यात आला. या कारवाईमुळे महागाव शहरात एकच खळबळ उडाली असून, रात्री उशिरापर्यंत एसीबीकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अधिकृत प्रसिद्धीपत्रकानंतर कारवाईचा सविस्तर तपशील स्पष्ट होणार आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.