पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) झालेल्या प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींची केवळ खेड तालुक्यापुरती नव्हे, तर तक्रार आलेल्या सर्व ठिकाणी चौकशी केली जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत दिली. शिक्षण आयुक्त कार्यालयाकडआून नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेची सर्वसधारण सभा सोमवारी झाली. यावेळी सर्वसाधारण सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते विजयसिंह शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत, केवळ खेड तालुक्यापुरती चौकशी मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रियेची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली. या मागणीला इतर सदस्यांनीही पाठिंबा दिला. यावर अध्यक्ष जगदाळे यांनी, शिक्षण आयुक्तांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर इतर तक्रारींचीही दखल घेतली जाईल, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी, एकाच विषयावर एकाच वेळी दोन वेगवेगळ्या स्तरांवर चौकशी करणे योग्य ठरणार नसल्याचे नमूद केले.
दरम्यान, विषयपत्रिकेनुसार सभेची सुरुवात होण्यापूर्वी काही जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी मागील सभेत मांडलेल्या प्रस्तावाची नोंद विषय पत्रिकेत घेण्यात आली नाही. आमच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर अध्यक्षांनी सर्वांची नोंद घेतली जाणार असल्याचे नमूद केले. जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या मुद्द्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. त्यावर शासनाकडून शिक्षकांची भरती होणार असल्याचे गजानन पाटील यांनी सांगितले. तर शासनाकडून शिक्षक रुजू होईपर्यंत ज्या शाळांमध्ये शिक्षक नाहीत, त्या ठिकाणी मानधनावर नवीन शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेत असल्याचे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सांगितले.
माॅडेल स्कूलबाबत सदस्यांना विचारात घेतले जाणार...
एकीकडे माॅडेल स्कूल राबविण्यात येत आहे. मात्र शाळांमध्ये शिक्षकच नाही. अशा स्थितीत माॅडेल स्कूल यशस्वी होणार का, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर गजानन पाटील यांनी माॅडेल स्कूल प्रकल्प महत्वाचा आहे, तो गांभीर्याने घ्यावा, असे सांगितले. त्याच वेळी अध्यक्ष जगदाळे यांनी शाळांचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, तसेच मॉडेल स्कूलची निवड करताना सदस्यांना विचारत घेतले जाईल, अशी ग्वाही दिल्यावर या विषयावर चर्चा थांबली.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.