पुणे : पुण्यातील बहुप्रतिक्षीत उच्च द्रूतगती वर्तुळाकार मार्गासाठी (एचसीएमटीआर) शासकीय जागा महापालिकेची अडवणूक न करता मोफत हस्तांतरण करा, रिंगरोडसाठी रोख मोबदला द्या, पाताल लोक प्रकल्पासाठी बोगद्यांच्या अलाईमेंट तज्ज्ञांकडून तपासून घ्या असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. २७) शासनाच्या विविध विभागाला दिले आहेत. या तिन्ही प्रकल्पाच्या उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक झाल्याने या प्रकल्पांना बुस्ट मिळाले आहे.
पुणे महापालिकेच्या १९८७ च्या विकास आराखड्यात पुणे शहराच्या भोवती वर्तुळाकार मार्ग करण्याचे नियोजन करण्यात आले. पण गेल्या ३९ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. त्यावरून केवळ कागदी घोडे नाचविले गेले आहेत. काही वर्षापूर्वी या प्रकल्पाला गती देण्यात आली होती. पण ही निविदा पूर्वगणनपत्रकापेक्षा तब्बल ४५ टक्के जादा दराने आल्याने ही निविदा रद्द करावी लागली. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा साईड ट्रॅकवर गेला होता.
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पाच बोगदे, पीएमआरडीए रिंगरोड आणि एचसीएमटीआर या तीन प्रकल्पांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. याच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. त्यांनी यासंदर्भात मुंबईत बैठक घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजित चौधरी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत अधिकाऱ्यांनी प्रकल्पांचे सादरीकरण केले.
२०२८ पर्यंत प्रकल्पाचे काम संपवा
पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उच्चक्षमता सामूहिक वाहतूक मार्ग प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. ४३.६० किमी अंतराच्या या प्रकल्पामुळे २५ ते ३० टक्के वाहतूक कमी होणार आहे. यामुळे सर्व मेट्रोमार्गिका जोडल्या जाणार असून रस्त्याची वाहतूक क्षमता वाढणार आहे. त्यामुळे एचसीएमटीआर या प्रकल्पाचे काम लवकर सुरू करुन २०२८ पर्यंत पूर्ण करा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. या एचसीएमटीआरच्या ५० टक्के जागेवर सध्या २४ मिटर रुंदीचा रस्ता अस्तित्वात आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांची ३० टक्के जागा आहे. ही महापालिकेला मोफत देऊन या प्रकल्पाला गती द्या. या प्रकल्पासाठी निधी उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी आर्थिक मॉडेल तयार करून प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
रिंगरोडला रोख मोबदला द्या
पीएमआरडीएद्वारे राबविण्यात येणारा अंतर्गत रिंग रोड हा प्रकल्प ८३.१२ किलोमीटरचा असून यामध्ये ४४ गावांचा समावेश आहे. या अंतर्गत रिंग रोडचे काम पाच टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्पाची प्रक्रिया येत्या सहा ते सात महिन्यांत पूर्ण करावी. भूसंपादन करण्यासाठी रोख मोबदला देऊन ही प्रक्रिया लवकर पूर्ण करा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तीन बोगद्यांसाठी सर्वेक्षण करा
पाताळलोक प्रकल्पाअंतर्गत पुणे शहरात तीन ठिकाणी बोगदे केले जाणार आहेत. भोसरी ते उंड्री ते पुरंदर नवीन विमानतळ या ३६ किलोमीटरच्या मार्गात २६ किलोमीटर बोगदा आणि १० किलोमीटरचा उन्नत मार्ग असणार आहे. रामनदी- भूगाव ते राजाराम पूल हा आठ किलोमीटरचा बोगदा असेल आणि तळजाई टेकडी ते पद्मावती-हिंगणे हा १.६५ किलोमीटर बोगदा असणार आहे. या बोगद्यांच्या जाळ्यांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची व तज्ज्ञ संस्थेची मदत घेऊन सर्वंकष सर्वेक्षण करावे, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.