पुणे : इंजिनमधील गंभीर उत्पादन दोष असलेले वाहन विकून ग्राहकाला वारंवार त्रास दिल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका कार उत्पादक कंपनीविरोधात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कंपनीने तक्रारदारास त्याच मॉडेलचे नवीन, दोषमुक्त वाहन संपूर्ण वॉरंटीसह देण्याचे अन्यथा वाहनाची संपूर्ण खरेदी किंमत व्याजासह परत करण्याचा आदेश आयोगाने दिला.


ग्राहकाला झालेला मानसिक त्रास, मनस्ताप, आर्थिक नुकसान आणि न्यायालयीन खर्चापोटी एक लाख १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा निर्देश आयोगाने कंपनी दिला. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरुण गायकवाड, सदस्या कांचन गंगाधरे आणि प्रणाली सावंत यांनी हा निकाल दिला. बाणेर येथील रहिवासी रामविलास कुमावत यांनी ‘एमजी मोटर्स’ विरोधात याबाबत तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी कंपनीच्या एका वितरकाकडून जून २०२० मध्ये २२ लाख २४ हजार रुपयांची कार खरेदी केली होती. काही दिवसांतच त्यांच्या कारच्या इंजिनमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड निर्माण झाला. सुरुवातीला हा किरकोळ दोष असावा, असे समजत तक्रारदाराने वाहन अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी दिले. मात्र दुरुस्तीनंतरही तोच दोष पुन्हा पुन्हा निर्माण होत राहिला. वाहन अनेक वेळा सर्व्हिस सेंटरमध्ये ठेवावे लागले, त्यामुळे तक्रारदाराला वाहनाचा नियमित वापर करता आला नाही. वारंवार दुरुस्ती, वेळेचा अपव्यय, आर्थिक खर्च आणि मानसिक त्रास यांचा मोठा फटका तक्रारदाराला बसला.


तक्रारदाराने कंपनीकडे अनेकदा पाठपुरावा करूनही कायमस्वरूपी उपाय करण्यात आला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी ॲड. समीर काळे यांच्यामार्फत आयोगात तक्रार दाखल केली. कारचे सर्व्हिस रेकॉर्ड, दुरुस्तीचा इतिहास, तांत्रिक कागदपत्रे आणि इतर उपलब्ध पुरावे न्यायालयासमोर सादर करून इंजिनमधील दोष हा केवळ वापरामुळे निर्माण झालेला नसून उत्पादनातील मूलभूत दोष असल्याचे सिद्ध करण्यात आले. तसेच कंपनीने अनेक वेळा दुरुस्ती करूनही दोष दूर करण्यात अपयश आल्यामुळे ही सेवा त्रुटी असल्याचे ॲड. काळे यांनी मांडले.


हा निर्णय ग्राहक संरक्षण कायद्याच्या उद्देशाला बळकटी देणारा असून वाहन उत्पादक कंपन्यांना उत्पादनाचा दर्जा, गुणवत्ता आणि विक्रीनंतरची सेवा याबाबत अधिक जबाबदारीने वागण्याचा स्पष्ट संदेश देणारा आहे. उत्पादनातील मूलभूत दोष असलेल्या वाहनांमध्ये केवळ वारंवार दुरुस्ती करून जबाबदारी टाळता येणार नाही, हे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.


ॲड. समीर काळे, तक्रारदार ग्राहकाचे वकील

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.