कायगाव : गंगापूर तालुक्यातील अमळनेर येथील शेतकरी जमील पठाण यांनी शनिवारी (ता.१) आपल्या ७ वर्षीय मुलगा इरफानच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमळनेर येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप केले. गेल्या ७ वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम आजही त्याच तळमळीने सुरू आहे.
हुशार मुलगा काळाच्या पडद्याआड
जमील पठाण यांचा एकुलता एक मुलगा इरफान जमील पठाण वय ७ हा इंग्लिश मीडियम शाळेत इयत्ता दुसरीत शिकत होता. वर्गात पहिला नंबर, शिक्षकांचा लाडका आणि डोळ्यात शिक्षणाची स्वप्ने घेऊन जगणारा चिमुकला.
३० मे २०१७ रोजी छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर - पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. एका क्षणात घरातील सगळे आनंदाचे रंग उधळले.
दुःखातून जन्मला संकल्प
मुलाच्या जाण्याने जमील पठाण यांच्या काळजाचा ठाव सुटला. पण त्यांनी त्या दुःखाला हार मानली नाही. २०१८ पासून त्यांनी ठरवले - "माझा इरफान जरी गेला, तरी त्याच्या वयाच्या इतर मुलांनी शिकावे."
तेव्हापासून दरवर्षी इरफानच्या जन्मदिनी किंवा स्मृतीदिनी ते गावातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देतात.
"माझा इरफान खूप हुशार होता. तो आज असता तर नक्कीच इतरांना मदत केली असती. मी फक्त त्याचे स्वप्न जगवतोय," असे म्हणताना त्यांचा गळा दाटून आला.
यावेळी मुख्याध्यापक रामनाथ फसले, शिक्षिका लता राऊत, गणेश पाटेकर, शिवाजी देशमुख, गणेश मिसाळ, वैभवी मिसाळ, कमलबाई सोनवणे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एका बापाच्या प्रेमाने आज इरफान अनेक मुलांच्या वहीत, पेनात आणि स्वप्नांमध्ये जिवंत आहे. हा उपक्रम समाजासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला आहे.
मुख्याध्यापकांची प्रतिक्रिया :
"शिक्षण हीच खरी समाजसेवा आहे. स्व. इरफानच्या स्मृतीप्रित्यर्थ जमील पठाण गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा व आधार मिळत आहे. दुःखाचे रूपांतर समाजोपयोगी कार्यात करण्याचा त्यांचा आदर्श निश्चितच प्रेरणादायी आहे.
रामनाथ फसले, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अमळनेर
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.