नागपूर : लग्न करून संसार थाटण्याचे स्वप्न पाहत गुजरातमधून नागपुरात आलेल्या तरुणाला ‘लुटेरी दुल्हन’ टोळीने जाळ्यात ओढून ७० हजार रुपये व दागिने लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तहसील पोलिसांनी या प्रकरणात दोन महिलांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नम्रता ऋतिक मालवीय (वय २१ रा. आनंदनगर,यशोधरागर), राणी ऊर्फ कोमल जितेंद्र पांडे (वय ३१ रा. जरीपटका), शहनाज ऊर्फ गुड्डी शहीद मोहम्मद अन्सारी (वय ३६) आणि उज्ज्वला शैलेश सोनटक्के (वय ४१) अशी अटकेतील महिलांची नावे आहेत. नम्रता ही फॅशन डिझाईनर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील भावनगर येथील आकाश पारेख याला परिचित मित्रामार्फत नागपुरातील मुलीचे स्थळ सुचविण्यात आले. त्यानुसार तो नागपुरात आला. नागपुरात राणी ऊर्फ कोमल पांडे हिने त्याची भेट नम्रता मालवीय हिच्याशी घालून दिली. मुलीच्या कुटुंबाला भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर टोळीने त्याला कोराडी परिसरातील एका घरात नेऊन मुलगी दाखवण्याचा बनाव केला. त्यानंतर त्याच दिवशी लग्न करण्याचे सांगून त्याचा विश्वास संपादन करण्यात आला.
लग्नाच्या तयारीच्या नावाखाली आकाशकडून एटीएममधून ७० हजार रुपये काढून घेण्यात आले. त्याचबरोबर त्याच्याकडील सोन्या-चांदीचे दागिनेही नम्रता हिच्याकडे देण्यास भाग पाडले. बर्डी परिसरात जात असताना एका व्यक्तीने नम्रता ही आपली पत्नी असल्याचा दावा करत वाद घातला. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे आकाशच्या लक्षात आले. आकाशने तत्काळ तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत नम्रता मालवीय आणि राणी ऊर्फ कोमल पांडे यांना अटक केली. या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारे इतरांची फसवणूक केली आहे का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.