मुंबई : मुंबई शहरात मुसळधार पावसानंतर आता पावसाळी आजारांनी डोके वर काढले आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै २०२६ मध्ये मुंबईत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस आणि H1N1 (स्वाइन फ्लू) च्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून दूषित पाण्यामुळे पोटविकाराच्या रुग्णांमध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे.
मलेरिया : ६५५ वरून थेट १,३८० वर
डेंग्यू : २६६ वरून ४६६ वर
चिकुनगुनिया : ७ वरून ७ (स्थिर)
लेप्टोस्पायरोसिस : ३३ वरून ७८ वर
गॅस्ट्रो : ६०३ वरून ८५१ वर
कोविड-१९ : २७ वरून ५८ वर
H1N1 (स्वाइन फ्लू) : ५८ वरून १०५ वर
पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांच्या परिसरात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नियमित सर्वेक्षण केले जात आहे. यासाठी अळीनाशक औषध फवारणी तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन ती नष्ट केली जात आहेत. 'शून्य डास प्रजनन मोहीम' पालिकेकडून शहरात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.
सर्वेक्षण केलेली घरे : ६ लाख ५९ हजार ३१६
जाचलेले नागरिक : २३ लाख ०१ हजार ९४२
रक्तनमुने संकलित : ७५ हजार ६५०
आरोग्य शिबिरे : १२३ शिबिरांचे आयोजन
लेप्टो प्रतिबंधात्मक उपचार : ५१ हजार २१६ नागरिकांना औषधोपचार
मलेरिया नियंत्रणासाठी पालिकेच्या पथकांनी तब्बल ५४ हजार ६०५ डास उत्पत्तीस्थळांची तपासणी केली. त्यापैकी ५ हजार ९६९ ठिकाणी डासांची उत्पत्ती आढळल्याने तिथे तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
डासांचा प्रादुर्भाव आणि आजारपण टाळण्यासाठी नागरिकांनी घरात, घराभोवती तसेच इमारतींच्या परिसरात पाणी साचणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. जुने टायर, पाण्याच्या उघड्या टाक्या, कुंडीतील कुंड्या, प्लास्टिक कंटेनर यांसारख्या वस्तूंमध्ये साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती वेगाने होते.
दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधक क्रीमचा वापर करावा. ताप, थंडी किंवा इतर लक्षणे आढळल्यास स्वतःच्या मनाने औषधे न घेता जवळच्या पालिका दवाखान्यात किंवा रुग्णालयात त्वरित संपर्क साधून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
ही बातमी वाचा:
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.