भारतीय संघातील डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा बिंधास्त अंदाज क्रिकेटप्रेमींनी अनुभवला आहे. अर्शदीप सिंग कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याने अनेक व्हिडीओ आणि रील पोस्ट केले होते. काही रील्सवरून वादही झाला होता, त्यामुळे डिलिट करण्याची वेळ आली होती. इतकंच काय तर बीसीसीआयने काही बंधनं देखील त्यानंतर लादली होती. पण अर्शदीप सिंगने आपला अंदाज काही बदलला नाही. चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही ना काही करत राहिला. आता पुन्हा एकदा अर्शदीप सिंग चर्चेत आला आहे. एका मुलाखतीत भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनची माफी मागण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. असं काय झालं की आर अश्विनला माफी मागावी लागली? अश्विनबाबत त्याने आपल्या मनातली गोष्ट सांगितली..
अर्शदीप सिंगला एका पॉडकास्टवर मुलाखती दरम्यान टॉप 5 गोलंदाजांची नावं जाहीर करण्यास सांगितलं. अर्शदीप सिंगने भारतातील टॉप 5 गोलंदाजांची नावं सांगितली आणि आर अश्विनची माफी मागितली. यात त्याने भुवनेश्वर कुमारला सर्वात वरचं स्थान दिलं, तर दिग्गज फिरकीपटू आर अश्विनला शेवटच्या स्थानावर ठेवलं. अर्शदीप सिंगच्या यादीत मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांची नावंही आहे. अर्शदीप सिंग म्हणाला की, ‘मला एश भाईला शेवटच्या स्थानी ठेवायचे नाही, पण जागा रिकामी नसल्यामुळे तो पाचव्या क्रमांकावर असेल. तो एक महान क्रिकेटपटू आहे आणि आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचा माझा पहिला कर्णधार होता. माफ करा एश भाई, मी तुम्हाला एक वैयक्तिक संदेश पाठवीन.’
अर्शदीप सिंग पुढे म्हणाला की, ‘मी भुवनेश्वर कुमारला अव्वल स्थानी ठेवीन कारण तो माझा वैयक्तिक आवडता आहे. तो मला खूप आवडतो, त्यामुळे त्याला पाठिंबा देणे हेच योग्य आहे. मी शमी भाईला दुसऱ्या क्रमांकावर ठेवीन कारण तो कोणत्याही खेळपट्टीवर सीम गोलंदाजी करू शकतो.’ अर्शदीप सिंगने चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवच्या कौशल्याची आणि बळी घेण्याच्या क्षमतेची प्रशंसा करत त्याला तिसऱ्या स्थानावर ठेवले आहे. तर पंजाब किंग्समधील सहकारी युझवेंद्र चहलच्या प्रभावी कामगिरीमुळे त्याला चौथे स्थान दिले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.