ठाणे : दुसऱ्यांचे जीव वाचवणारे ठाण्यातील TDRF जवान विकास गोरे यांचा ठाण्यातील खड्ड्यांनी जीव घेतला. मात्र त्यावरून पोलिसांचे असंवेदनशील वक्तव्य समोर आलं असून गोरे कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागला. तुमच्या मुलाला रस्त्यावरचा खड्डा दिसला नाही का? असा प्रश्न एका पोलीस अधिकाऱ्याने गोरे कुटुंबीयांना विचारला. त्यावर मनसेचे नेते अविनाश जाधव चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. एखाद्या अधिकाऱ्याच्या मुलाच्या बाबतीत असं काही घडल्याशिवाय त्यांना जाग येणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 


शहापूर तालुक्यातील भारंगी नदीच्या पुलाजवळ खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात ठाणे TDRF पथकातील जवान विकास लहू गोरे (वय 31) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने पुन्हा एकदा प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला असून त्यात सर्वसामान्यांचा बळी जात असल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. त्यातच एका पोलीस अधिकाऱ्याने गोरे कुटुंबीयांना 'तुमच्या मुलाला रस्त्यावरचा खड्डा दिसला नाही का?' असा प्रश्न विचारला.


Avinash Jadhav MNS : अविनाश जाधव यांचे प्रत्युत्तर 


पोलीस अधिकाऱ्याच्या असंवेदनशील वक्तव्यावर अविनाश जाधव म्हणाले की, " त्याला रस्त्यावरचा पुढे येणारा खड्डा दिसायला तो काय ज्योतिषी होता का? दुःखात असताना त्याच्या कुटुंबांला हा प्रश्न विचारणे हे चुकीचे आहे. ज्याने कोणी असा प्रश्न विचारला आहे त्याने एक दिवस आमच्या सोबत यावं, रस्त्यावर बाईक चालून दाखवावे. समोरचे खड्डे कसे अचानक येतात ते आम्ही त्याला दाखवून देतो. अशा प्रकारचं वक्तव्य करून त्या कुटुंबाचे मनोधैर्य तोडण्याचं काम पोलिसांनी कृपया करू नये.


Thane TDRF Jawan Death : ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी


ठाणे महापालिकेतील नेत्यांना किंवा अधिकाऱ्यांना लोकांशी काही घेणं देणं नाही. कुणी मेलं किंवा कुणाला काही झालं तर यांना काही फरक पडत नाही, असं अविनाश जाधव म्हणाले, ते म्हणाले की, "ज्यांच्यामुळे खड्डे होतात, ज्यांनी करोडो रुपये खड्डे भरण्यासाठी सरकारकडून घेतले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल व्हावा. मी स्वतः उद्या त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहे."


अविनाश जाधव म्हणाले की, "प्रशासनाला वाटतं की एखादा माणूस गेल्यानंतर दोन दिवस बोंबाबोंब होते, नंतर लोक विसरून जातात. मनसे मात्र यापुढे या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करेल. एखाद्या अधिकाऱ्यांच्या मुलाबाबत अशी गोष्ट घडत नाही तोपर्यंत यांचे डोळे उघडणार नाहीत. माझी देवाकडे प्रार्थना आहे की अधिकाऱ्यांचे डोळे उघडावेत आणि कोणाचाही बळी अशा खड्ड्यांमध्ये जाऊ नये."


Thane Bhiwandi Accident : खड्ड्यांच्या नावाखाली कोट्यवधी खातात


ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करताना अविनाश जाधव म्हणाले की, "नालेसफाई असो वा खड्ड्यांच्या बाबतीत असो, कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जाते. अधिकाऱ्यांचा आणि राजकीय नेत्यांचा हा व्यवसाय आहे. प्रत्येक पावसाळ्यामध्ये खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढणं आणि त्यातून पैसे कमावणे हा त्यांचा धंदा आहे आणि म्हणूनच रस्त्यांची परिस्थिती जैसे थे आहे. घोडबंदर रोडचे खड्डे दुरुस्त व्हावे यासाठी कितीतरी आंदोलन झाली, मात्र परिस्थिती जैसे थे आहे. खड्डे कायमस्वरूपी बुजले तर यांचं पोट कसं भरेल? यांचं पगारावर पोट चालत नाही यांचे कमिशन वर पोट चालतं. जोपर्यंत या अधिकाऱ्यांना आपण झोडत नाहीत तोपर्यंत त्यांना अक्कल येणार नाही."



ही बातमी वाचा:


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.