[ad_1]

नीट पेपर लीकच्या विरोधात गेल्या महिन्यापासून राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरू होतं. याच आंदोलनादरम्यान एका 15 वर्षांच्या मुलीने, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप होता. त्यानंतर तिने या प्रकरणी माफी मागितली. सार्वजनिकरित्या तिने तिची चूक कबूल करत माफी मागितली. मात्र आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पंतप्रधानांबद्दल नको ते बोलणाऱ्या या मुलीला सतत धमक्या मिळत आहेत. अवघ्या 15 वर्षांच्या या मुलीला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, या धमक्यांमुळे तिला आणि तिच्या आईला गेल्या काही दिवसांत तब्बल तीन वेळा त्यांचं राहतं घर बदलावे लागल्याचं वृत्त आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सततच्या धमक्यांमुळे कुटुंबाला वारंवार ठिकाण बदलावे लागत असल्याचं, त्या मुलीचे वकील अनिल कुमार यांनी सांगितलं. सोशल मीडियावर मुलीबाबत पसरवल्या जाणाऱ्या अनेक दावेही त्यांनी फेटाळून लावले.

वकिलांचं म्हणणं काय ?

तक्रार दाखल झाली तेव्हा मुलगी केवळ 14 वर्षांची होती. 1 ऑगस्ट रोजीच ती 15 वर्षांची झाली असून, सध्या ती दिल्लीच्या ओपन स्कूलिंग प्रणालीतून दहावीचे शिक्षण घेत आहे, असं वकिलांनी नमूद केलं. पंतप्रधानांबद्दल वाट्टेल ते बोलणारी ही मुलगी 25 वर्षांची असून, सलून कर्मचारी असल्याचा आणि तिचे नाव ‘रुचिका’ असल्याचा दावा, सोशल मीडियावर केला जात आहे, पण हे सर्व दावे पूर्णपणे खोटे असल्याचं वकिलांनी स्पष्ट केलं.

त्या मुलीची आई एकल पालक (सिंगल पॅरेंट) असून शिकवण्या घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. मात्र सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्यांना वारंवार घर बदलावं लागत आहे, असंही वकिलांनी नमूद केलं.

FIR सार्वजनिक झाल्यानंतर वाढल्या धमक्या

वकिलांच्या म्हणण्यानुसार, FIR मध्ये घराचा पत्ता उघड झाल्यानंतर काही व्यक्ती आणि समाजकंटक त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी मुलगी व तिच्या आईला बलात्कार तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. “एफआयआरमधील पत्ता सार्वजनिक झाल्यानंतर काही राजकीय संघटनांशी संबंधित लोक आणि समाजकंटक घरापर्यंत पोहोचले. त्यांनी थेट बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे कुटुंबाला अनेक वेळा घर सोडावे लागलं,” असा दावा वकिलांनी केला आहे.

अल्पवयीन मुलीने मागितली होती माफी

यापूर्वी संबंधित मुलीने सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करून देशवासीयांची सार्वजनिक माफी मागितली होती. पंतप्रधानांविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडीओ तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केलेला नव्हता आणि आपल्या कृतीबद्दल तिला अत्यंत पश्चात्ताप होत आहे, असं तिने म्हटलं होतं. “मी माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत सीपी (कनॉट प्लेस) येथे गेले होते. तिथे आंदोलन सुरू होते. अनेक जण पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरत होते. त्यांच्या प्रभावाखाली येऊन मीही तसेच बोलले” असं तिने माफीच्या व्हिडीओमध्ये नमूद केलं. “मी फक्त 15 वर्षांची आहे. मी जे बोलले ते माफीयोग्य नाही. मी खूप चुकीचे शब्द वापरले. पण ही माझी पहिली आणि शेवटची चूक असेल. यापुढे मी असं कधीच करणार नाही. तो व्हिडीओ मी स्वतः पोस्ट केलेला नव्हता. मी संपूर्ण देशाची माफी मागते. मला इतकी लाज वाटते की, मी कोणाकडे डोळे वर करूनही पाहू शकत नाही” असं म्हणत त्या मुलीन तिच्या कृत्याविषयी, विधानांविषयी माफी मागितली होती.

झिरो एफआयआर दाखल

यापूर्वी गाझियाबाद येथील स्मृती सिंह यांनी 29 जुलै रोजी नोएडाच्या एक्स्प्रेसवे पोलीस ठाण्यात मुलीविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान मुलीने पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह आणि असंसदीय भाषा वापरून घटनात्मक पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला होता.

मात्र, ही तक्रार दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक व्हिडीओ संदेश जारी करून आंदोलनादरम्यान स्वतःविरोधात आणि त्यांच्या दिवंगत आईविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्यांना माफ करण्याची भूमिका मांडली होती. “आपल्या मुलींकडून अशा प्रकारची भाषा वापरली जाणे ही चिंतेची बाब आहे. मात्र, ही मुले दिशाभूल झालेली असून त्यांना माफ करून योग्य मार्ग दाखवण्याची गरज आहे,”असं पंतप्रधानांनी नमूद केलं होतं.



[ad_2]

Source link

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.