भारतीय संघातील ‘वर्कलोड मॅनेजमेंट’चा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संघाला लागलेले दुखापतींचे ग्रहण काही केल्या सुटण्याचे नाव घेत नाही आहे. आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारताला जोरदार धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे पुन्हा जायबंदी झाल्याने तो या मालिकेतून बाहेर पडला आहे. वर्कलोड आणि भविष्यातील मोठ्या स्पर्धांचा विचार करून बुमराहला काही काळ विश्रांती द्यावी. त्याच्या जागी अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना संघात परत आणावे, असा सल्ला भारताचे माजी वेगवान गोलंदाज करसन घावरी यांनी निवड समितीसह संघ व्यवस्थापनाला दिला आहे.


घावरी म्हणाले की, “बुमराहने ५-६ महिने किंवा अगदी एका वर्षाचा ब्रेक घेऊन १०० टक्के फिटनेस मिळवला पाहिजे. तो पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही त्याला मोठ्या स्पर्धांमध्ये मैदानात उतरवले जाते. त्यामुळे तो वारंवार दुखापतग्रस्त होतो आणि ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब आहे.”


भारतीय गोलंदाजीला अधिक बळ देण्यासाठी अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना संघात परत आणावे. ते सातत्याने अप्रतिम कामगिरी करत आहेत, त्यामुळे निवडकर्त्यांनी त्यांचा नक्कीच विचार करायला हवा. बुमराहसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणे शक्य नाही; त्यामुळे त्याला प्रामुख्याने कसोटी क्रिकेटपुरते मर्यादित ठेवून मोहम्मद सिराज, शमी आणि भुवनेश्वरची साथ द्यावी, असे घावरी यांनी यावेळी सांगितले.




Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.