Dil Chahta Hai: बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमांपैकी एक असलेल्या ‘दिल चाहता है’ला (Dil Chahta Hai) यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने हिंदी सिनेमातील मैत्रीची व्याख्याच बदलून टाकलेली. पण हा सिनेमा बनवणं तसं सोपं नव्हतं. कारण, त्यावेळी बॉलिवूडमध्ये रोमँटिक ड्रामा आणि लव्ह ट्रँगलला मोठी मागणी होती. त्यामुळे मल्टिस्टारर किंवा मल्टी-हिरो सिनेमात काम करण्यास फार कलाकार उत्सुक नसायचे. इतकंच नव्हे, तर 'दिल चाहता है'च्या वेळीही कास्टींगच्या वेळी त्रिकूटातील एका कलाकाराची तब्बल 8 महिने वाट पहावी लागल्याचंही दिग्दर्शक फरहान अख्तरने सांगितलं.. फरहानने सांगितलं की, तीन मित्रांच्या आयुष्याभोवती फिरणाऱ्या या कथेचा भाग होण्यासाठी कलाकारांना तयार करणं त्याच्यासाठी मोठं आव्हान होतं.
‘द जगरनट’ला दिलेल्या मुलाखतीत फरहान अख्तरने विशेषतः आमिर खानला कास्ट करण्याबाबतचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, “आमिर खानला कास्ट करणं सोपं नव्हतं. प्रत्येकजण म्हणत होता, ‘मला मल्टी-हिरो फिल्म करायची नाही.’ त्यावेळी प्रत्येकाला लव्ह ट्रँगल करायचा होता.”फरहान सुरुवातीपासूनच सिनेमाच्या कथानकाबाबत स्पष्ट होता. दोन पुरुष एका मुलीसाठी एकमेकांशी भांडतात, अशा पारंपरिक कथानकावर ‘दिल चाहता है’ आधारित नसावा, असं त्यांचं ठरलेलं होतं.“माझ्यासाठी या सिनेमाचा केंद्रबिंदू मैत्री होता. त्यामुळे दोन मुलं एका मुलीसाठी भांडताना मला दाखवायची नव्हती,” असं फरहानने सांगितलं.
आमिर खानला सिनेमाची स्क्रिप्ट ऐकवण्यासाठीही फरहानला बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. विशेष म्हणजे फरहानचे वडील आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी यापूर्वी आमिर खानसोबत ‘लगान’मध्ये काम केलं होतं. तरीही फरहानने या ओळखीचा फायदा घेत आमिरपर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही विशेष शिफारस केली नाही. याबद्दल सांगताना फरहान म्हणाला, “मी कोणत्याही विशेष ओळखीची मागणी केली नव्हती. मी सतत प्रयत्न करत राहिलो आणि आमिरने पूर्ण स्क्रिप्ट ऐकण्यासाठी होकार देईपर्यंत तब्बल 8 महिने वाट पाहिली.”आमिरने नंतर त्याला सांगितलं की, त्याला सिनेमात कास्ट करण्यासाठी फरहानने दाखवलेली चिकाटी त्याला आवडली. फरहानला आमिरला या भूमिकेतच पाहायचं होतं, हे त्याच्या प्रयत्नांतून स्पष्ट झालं होतं.
2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल चाहता है’ने मुख्य प्रवाहातील हिंदी सिनेमात मैत्रीचं एक नवं रूप प्रेक्षकांसमोर आणलं. आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान यांच्या तीन मित्रांच्या आयुष्याची कथा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली.आज या सिनेमाला 25 वर्षे पूर्ण होत असताना फरहान अख्तरचा ‘दिल चाहता है’च्या कास्टिंग चा किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.