मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीमध्ये “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “जय भवानी, जय शिवाजी” अशा उद्घोषणा (Announcements) करण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे. दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भातील मागणीचे पत्र सुपूर्द केले.
सीएसएमटी हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य आणि राष्ट्रभक्तीच्या विचारांचे प्रतीक असल्याने या उपक्रमाच्या माध्यमातून शिवरायांचा संदेश देशभरात पोहोचेल, असे राहुल नार्वेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
विधानसभा अध्यक्षांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या पत्रातील महत्त्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत:
सीएसएमटी स्थानकावरून सुटणाऱ्या आणि दाखल होणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांच्या नियमित घोषणांसोबतच (Standard Announcements) “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “जय भवानी, जय शिवाजी” या जयघोषाचा अधिकृतपणे समावेश केला जावा.
सीएसएमटी हे देशातील अत्यंत महत्त्वाचे स्थानक असून येथून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वेगाड्यांमधील उद्घोषणेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि लोककल्याणकारी विचारांचा संदेश महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल.
महाराजांचे प्रशासन, शौर्य आणि राष्ट्रहिताची भूमिका आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, यासाठी अशा उपक्रमाची गरज आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून रेल्वे प्रशासनाला तात्काळ आवश्यक सूचना द्याव्यात, अशी विनंती राहुल नार्वेकर यांनी केली आहे. रेल्वे मंत्रालयाने ही मागणी मान्य केल्यास रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून शिवरायांच्या स्वराज्याचा जयघोष देशभर पोहोचवण्याचा एक अभिनव उपक्रम सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ही बातमी वाचा:
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.